शरद पवार यांच्यामुळे अजित पवारांची राजकीय प्रभा खुंटली , त्यांना शरद पवार नावाच्या मोठ्या झाडामुळे स्वतः वाढता आले नाही, असले काही नेरेटिव्ह अजित पवार समर्थक नेहमी सांगत असतात. अजित पवारांच्या कृतीचे समर्थन करायचे असेल तर त्यांना असले काहीबाही सांगावे लागते . त्याला कोणाचा काही आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र आता अजित पवार ज्या भाजपसोबत गेले आहेत, त्या मोदींनीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात एकही जागा न देऊन अजित पवारांची स्वतःची राजकीय उंची किती आहे हे दाखवून दिले आहे. प्रत्येकवेळी सावरून घ्यायला नरेंद्र मोदी काही अजित पवारांचे काका नाहीत इतके जरी अजित पवार समर्थकांनी समजून घेतले तरी बरे .
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार नावाचा मोठा दबदबा राहिलेला आहे. शरद पवारांचे पुतणे म्हणून अजित पवार राजकारणात आले. त्यांचा स्पष्टवक्तेपणा , त्यांच्यातील वक्तशीरपणा, प्रशासनावर त्यांची असलेली पकड , कार्यकर्त्यांना शब्द दिल्यावर तो शब्द पाळणारा नेता म्हणून अजित पवारांनी निर्माण केलेली स्वतःची प्रतिमा यामुळे अजित पवार हे नाव राज्याच्या राजकारणात वेगाने पुढे आले. यात अजित पवारांचा स्वतःचा वाटा मोठा आहेच, ते नाकारण्यासारखे देखील नाही. मात्र हे सारे असले तरी अजित पवारांच्या मोठे होण्यात 'ते शरद पवारांचे पुतणे आहेत ' या वास्तवाचे योगदान तितकेच महत्वाचे असते. राजकारणात अनेकांना छोट्यात छोटी चूक देखील माफ होत नाही, त्या काळात शरद पवारांनी अजित पवारांचे 'प्रमाद ' देखील सहज माफ केले. अजित पवारांनी राजकीय पसारा करायचा आणि शरद पवारांनी त्यांना सावरायचे असे महाराष्ट्राने अनेकदा पाहिले आहे. तर अशा अजित पवारांची राजकीय प्रगती शरद पवारांमुळे खुंटली , शरद पवारांची राजकीय सावलीच इतकी मोठी आहे की त्या सावलीत इतर कोणते झाड उबदाऱ्या येणार नाही असले काही बाही सांगण्याचा मोह अजित पवार समर्थकांना नेहमीच होत असतो. अगदी शरद पवारांपासूनच त्यांचा पक्ष हिसकावणारे बंड अजित पवारांनी केल्यानं अंतर त्याला तात्विक मुलामा देण्यासाठी देखील असल्याचं काही सटरफटर नेरेटिव्हचा आधार अजित पवार समर्थक अजूनही घेत आहेत. घेवोत बापडे . पण आता ज्या शरद पवारांच्या सावलीतून अजित पवार स्वतत्र होत भाजपच्या वळचणीला गेले होते, त्या भाजपने अजित पवारांची काय पत्रास ठेवली आहे ?
एकीकृत राष्ट्रवादीमध्ये असताना अजित पवारांचा पक्षात मोठा दरारा हिवता, काही अपवाद वगळता शरद पवारांनी राज्याची सारी सूत्रे अजित पवारांकडे दिली होती. अगदी कोणाला कोठून तिकीट द्यायचे याबाबतही अजित पवारांचा शब्द महत्वाचा होता. त्या अजित पवारांना भाजपसोबत गेल्यानंतर आपल्या समर्थकांना जागा मिळविण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागली आणि अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले, त्यातही कहर म्हणजे त्यातील केवळ एक जागा अजित पवार लोकसभेला निवडणून आणू शकले. म्हणजे अगोदरच भाजपने अजित पवारांची जागा वाटपात फरफट केली होतीच, आता निवडणूक निकालांनी राहिली राहिली कसर जनतेने भरून काढली आणि अजित पवारांच्या चेहऱ्यावरचा फार मोठ्या राजकीय उंचीचा , प्रगल्भतेचा वर्ख अगदीच उडून गेला . त्यामुळे या चेहऱ्याला भाजप फार काही महत्व देईल असे अपेक्षित नव्हते आणि घडलेही तसेच. लोकसभेत एकही जागा नसणाऱ्या रामदास आठवलेंना मंत्रिपद देण्यात आले. बिहारमध्ये केवळ एक जागा असलेल्या जितनराम मांझी यांच्या पक्षाला १ मंत्रिपद देण्यात आले, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला मंत्रिपद आले नाही . आता भलेही 'ते आम्हाला एक राज्यमंत्री पद देत होते आणि आमचे पटेल केंद्रीय मंत्री राहिल्याने राज्य मंत्री कसे होणार ? ' असले काही राष्ट्रवादीवाले सांगत आहेत. मात्र त्यांनी काहीही सांगितले तरी भाजपच्या द्दृष्टीने अजित पवारांच्या पक्षाची जागा केंद्रातल्या एका राज्यमंत्रिपदाची असेल तर अजित पवर्णसाठी हे राजकीय अडचणी वाढविणारे आहे.
अगोदरच लोकसभा निवडणुकांचे निकाल येण्याअगोदरच अजित पवारांच्या पक्षात धुसफूस सुरु झालेली आहेच. पक्षाच्या बैठकीत छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका, भाजपला आताच सांगा म्हणत केलेले भाषण आणि आता लोकसभेच्या निकालानंतर शरद पवारांचे वाढलेले राजकीय महत्व पाहता, भाजप अजित पवारांसाठी थोडा ढळता हात सोडणार नसेल तर अजित पवारांनी करायचे काय ? कदाचित आता तरी नरेंद्र मोदी हे काही आपले काका नाहीत हे अजित पवारांना आणि त्यांच्या समर्थकांनाही समजायला हरकत नाही.