Advertisement

पत्नीबद्दल अपशब्द बोलला,डोके ठेचून मित्राचा खून केला

प्रजापत्र | Saturday, 08/06/2024
बातमी शेअर करा

नागपूर : घरून निघून गेलेल्या पत्नीला शोधत असताना मित्र पत्नीबद्दल अपशब्द बोलला. त्यामुळे रागाच्या भरात आणि दारुच्या नशेत एका मित्राने आपल्या मित्राचा सिमेंटच्या विटेने डोक्यावर मारून खून केला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री १० ते १२.३० वाजताच्या दरम्यान घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

 

 

अंकूश गणेश आखरे (३३, रा. सौभाग्यनगर, हु डकेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर धवल पांडुरंग नाटकर (३३, रा. चक्रपाणीनगर पिपळा रोड हुडकेश्वर) असे मृताचे नाव आहे. हुडकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धवल नाटकर हा एका कूलर कंपनीमध्ये अभियंता होता. त्याला आई-वडील नसल्याने तो दररोज सौभाग्यनगर येथे राहणाऱ्या बहिणीकडे जेवण करण्यासाठी जात असे. तर आरोपी अंकूश आखरे याचे इलेक्ट्रिक वाहन दुरुस्तीचे गॅरेज आहे. दोघेही मित्र असल्याने ते नेहमीच सोबत दारु प्यायचे. शुक्रवारी रात्री धवल बहिणीकडे सौभाग्यनगरात जेवन करण्यासाठी आला. त्याने अंकुशला फोन करून दारू पिण्यासाठी बोलाविले. दोघांनीही विठोबा लॉनच्या मागील बारमध्ये सोबत दारु घेतली. त्यानंतर अंकुश आपल्या घरी गेला. परंतु तो दारुच्या नशेत टुन्न असल्यामुळे तो आपल्याशी भांडण करेल या भितीने त्याची पत्नी एक वर्षाच्या मुलाला घेऊन घरून निघून गेली. पत्नी घरून निघून गेल्यामुळे अंकुशने धवलला फोन करून बोलावून घेतले. दोघेही दुचाकीवर फिरून अंकुशच्या पत्नीला शोधत होते.

 

 

 

सावरबांधे ले आऊट येथील सावरबांधे सभागृहाजवळ धवलने अंकुशला तु अशा मुलीसोबत लग्नच कशाला केले ? असे म्हणून त्याच्या पत्नीबाबत अपशब्द वापरले. पत्नी सोडून गेल्यामुळे आधीच संतप्त झालेल्या अंकुशने चिडून सिमेंटची विट धवलच्या डोक्यात मारली. त्यामुळे धवल खाली कोसळला. त्यानंतर अंकुशने त्याच्या डोक्यावर वार करून त्याला जागीच ठार केले. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी आरोपी अंकुशला ताब्यात घेतले. या प्रकरणी धवलचे जावई सारंग रामकृष्ण रणदिवे (३६, रा. सौभाग्यनगर हुडकेश्वर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी अंकुशविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Advertisement

Advertisement