समीर लव्हारे
बीड दि.३१-अत्यंत शिस्तीचे खाते आणि वरिष्ठांबद्दलचे 'प्रोटोकॉल' जिथे फार गांभीर्याने घेतले जातात अशा खात्यात एखाद्या गुन्ह्यात आपल्यापेक्षा पदाने वरिष्ठ असलेल्या अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोलावून त्यांचे जवाब नोंदविण्याचे आव्हान सध्या बीडच्या एसीबी समोर आहे.निलंबित पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्या लाचखोरी प्रकरणात आता पोलीस उपाधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक आदींचे जवाब नोंदविण्यात येत आहेत.ज्या प्रकरणात हरिभाऊ खाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे,त्या प्रकरणात अगदी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या मार्गदर्शनात एसआयटी गठीत करण्यात आली होती, त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत जातील ते सांगणे अवघड आहे.अशावेळी एक उपाधिक्षक (मूळचे पीआय) वरिष्ठांना सवाल जवाब किती निर्भयपणे करतील असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.
बीड जिल्ह्यातील माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटमधील अपहाराच्या प्रकरणात एकाविरुद्ध कारवाई न करण्यासाठी तब्बल एक कोटीच्या लाचेही मागणी केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्याविरुद्ध एसीबीने गुन्हा नोंदविला आहे.गुन्हा नोंद होताच त्याच्या अटकेचीही वाट न पाहता पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याला 'निलंबित' करण्याची 'तत्परता' दाखविली होती.यावरूनच सदर प्रकरण किती 'हाय प्रोफाइल' आहे याचा अंदाज येऊ शकतो.काही दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेतील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना आणि आता आर्थिक गुन्हे शाखेच्या पीआयला लाचेच्याच प्रकरणात अटक झाल्यामुळे एसपींच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या शाखा अडचणीत आल्या आहेत.विशेष म्हणजे माँसाहेब जिजाऊ प्रकरणात गुन्हे दाखल झाले आणि तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला तेव्हापासून या प्रकरणात तपास ढिलाईने होत असल्याबद्दल ठेवीदारांच्या तक्रारी आहेत.त्यामुळेच सुरुवातीला काही दिवस हे प्रकरण केजचे तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे सोपविण्यात आले होते, तर नंतर या प्रकरणाच्या तपासासाठी थेट विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या निगराणीत एसआयटीने गठन करण्यात आले होते. या एसआयटीने यात फार काही प्रगती केली नाही,हा भाग वेगळा, मात्र यासाऱ्या घटनाक्रमातून हे प्रकरण अधिक गंभीर होत गेले.याच प्रकरणात तपास अधिकारी म्हणून आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक म्हणून हरिभाऊ खाडे याने एक कोटीच्या लाचेची मागणी केली, म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
एसीबीने हा गुन्हा दाखल केल्यानंतर आता तपासाची चक्रे वेगाने पुढे सरकत आहेत.या प्रकरणाचा तपास एसीबीचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्याकडे आहे. त्यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल कुठलाही संशय नसला,तरी शंकर शिंदे यांचे मूळ पद पोलीस निरीक्षक आहे.आता त्यांना पोलीस खात्यातच पोलीस उपाधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक या वरिष्ठ पदावरील व्यक्तींना तपासासाठी बोलवावे लागत आहे. ही साखळी आणखी किती दूर जाईल हे देखील माहित नाही. त्यामुळे आता 'शिस्तीच्या' आणि पदांच्या बाबतीत,पदांच्या मानमरातबाच्या बाबतीत जास्तीच 'कडक' असलेल्या खात्यात वरिष्ठांना प्रश्न विचारण्याचे आव्हान एसीबीच्या अधिकाऱ्यांना कसे पेलवणार ? हा देखील प्रश्न आहे.त्यामुळेच आता या लाचखोरी प्रकरणात देखील एसीबीच्याच विशेष महानिरीक्षक किंवा त्यापेक्षा मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्याने लक्ष घातल्यास तपास अधिकाऱ्यांना बळ मिळू शकेल आणि या प्रकरणाची पाळेमुळे खरोखर शोधता येतील.