Advertisement

 टक्केवारीसाठी बंडखोरी केलेल्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश नाही!

प्रजापत्र | Saturday, 25/05/2024
बातमी शेअर करा

लोकसभा निवडणूक राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे. त्यामुळे शरद पवार यांना सोडून गेलेले अनेक आमदार परतीच्या मार्गावर आहेत. असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व आमदार अजित पवार गटात सहभागी झाले होते. यामध्ये विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, मंत्री छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितीन पवार आणि सरोज अहिरे या सहा आमदारांचा समावेश आहे. लोकसभेच्या निवडणुकीत या सर्व आमदारांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक यांनी लोकसभा निवडणुकीत सामान्य जनतेमध्ये शरद पवार यांच्या विषयी मोठी सहानुभूती होती. हे सर्व मतदार यातूनच महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. याची जाणीव प्रचारादरम्यान महायुतीत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांना झाली आहे. लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडी  जिंकेल. त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे.

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीने अतिशय जोरकस प्रचार केला आहे. महायुतीकडे सत्ता आणि संपत्ती असली तरीही मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे बंडखोरी केलेले नाशिक   जिल्ह्यातील बहुतांश आमदार परत फिरण्याच्या तयारीत आहेत. मात्र या आमदारांबाबत कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत.

पक्षाच्या वाईट काळात जिल्ह्यातील बंडखोर आणि फुटीर आमदारांनी टक्केवारीच्या मोहातून विकासाचे नाव सांगत सत्ताधारी पक्षात सामील झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना त्यांनी एकटे सोडले या काळात सर्वसामान्य कार्यकर्ता शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. आगामी काळातही हे कार्यकर्ते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने युवकांमधून नवे नेतृत्व निर्माण करतील. त्यामुळे कितीही मोठा आमदार किंवा मंत्री असला तरीही त्याला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येऊ देणार नाही. त्याला आमचा तीव्र विरोध असेल.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  या पक्षाशी देखील आमदारांनी गद्दारी केली. या आमदारांबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय तीव्र भावना आहेत. या आमदारांना पुन्हा पक्षात घेण्यात येणार नाही, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटांनी यापूर्वीच केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्येही हेच वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

Advertisement