छत्रपती संभाजीनगर, वाळूज, सिल्लोड आणि त्यानंतर गर्भपात रॅकेटचे धागेदोरे आता थेट भोकरदन शहरापर्यंत पोहोचले आहेत. गर्भपात तपासा प्रकरणी संभाजीनगरचे एक पथक भोकरदन शहरात दाखल झाले. हे पथक भोकरदन शहरात दाखल होताच तेथील 2 डॉक्टर व काही मेडिकल व्यावसायिकांनी भोकरदन शहरातून पळ काढला आहे. या पथकाने दोन्ही डॉक्टरांच्या पत्नीला पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.
या नाेटीसमध्ये पाेलिसांनी डाॅक्टरांना तात्काळ हजर राहण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. दरम्यान या सर्व गर्भपात प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाळूज गर्भपात प्रकरणात कारागृहात असलेला डॉक्टर सतीश सोनवणे असल्याची माहिती आतापर्यंत झालेल्या तपासातून स्पष्ट झाली आहे.
त्याशिवाय त्याच्यावर बीड (2), जालना (1) आणि वाळूज (1) येथे एकुण 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामधील धक्कादायक माहिती अशी की डॉ. सतीश सोनवणे यानेच सर्वांना गर्भलिंग निदान कसे करायचे हे शिकवले असल्याची माहिती तपासाअंती समोर आली आहे.