पुणे -मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट करत पावसाच्या सरी कोसळतील. त्यासाठी हवामान विभागाने राज्यातील १९ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ दिला आहे.
राज्याच्या वेगवेगळ्या भागाला गेल्या आठवड्यापासून वादळी वाऱ्याचा तडाखा बसत आहे. पुढील तीन दिवसांमध्ये राज्यातून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे सोमवारी (ता. २०) राज्याला हवामानाचा कोणताही इशारा असल्याची स्थिती सध्या दिसत नाही, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. भारत हा उष्ण कटिबंधीय प्रदेशात येतो. त्यामुळे तेथील हवामानात वेगाने बदल होतात. त्यानुसार या अंदाजामध्ये दोन ते तीन दिवसांनी काही प्रमाणात बदल होऊ शकतो, असेही विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ४२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ४० अंशांच्या वर आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या.आग्नेय राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्यामुळे मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. रायलसीमा आणि उत्तर तमिळनाडूमध्ये समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
उन्हाचा चटका कमी
राज्यात वळिवाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे उन्हाच्या चटक्यांनी होरपळून निघालेल्या राज्याला काही अंशी दिलासा मिळाला. मात्र उकाडा कायम आहे. राज्यात शनिवारी (ता. १८) विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. कमाल तापमान कमी-जास्त होण्याचा अंदाजदेखील विभागाने वर्तविला आहे.
या जिल्ह्यांना इशारा...
अहमदनगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.