ठाणे- निवडणूक सुरु झाली आणि कापसाचे भाव हजार रुपयाने कमी झाले तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट का नाही, कारण त्याच्या डोक्यात निळा भगवा हिरवा घातलाय अशी खंत प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. निवडणूक मुद्द्यावर झाली पाहिजे, धर्म आणि जातीवर होता कामा नये असंही ते म्हणाले. निवडणूक आमच्या हक्कांवर, आमच्या वेदनेवर झाल्याचं दिसत नाही अशी खंत बच्चू कडू यांनी कल्याणामध्ये व्यक्त केली. बच्चू कडू भिवंडी लोकसभेचे उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचार सभेसाठी आले होते . यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजपावर सडकून टीका केली.
मुंबईतली सहा हजार एकर जमीन केवळ सहा लोकांजवळ
आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, ३४ हजार एकरावर असलेल्या मुंबईमधील सहा हजार एकर जमीन फक्त सहा लोकांजवळ आहे. या जमिनीला सील का लावला जात नाही? मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस साधं पाय पसरू शकत नाही. त्याला राहायला घर नाही. अन्न, वस्त्र निवाऱ्यामधील निवारा कुणी हिसकावला? जर सहा हजार एकर जमीन सहा लोकांजवळ राहत असेल, कष्ट करणाऱ्या लोकांना घरे मिळत नसतील, मग हे प्रश्न लोकांनी सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजेत. धर्म आणि जातीच्या आडून आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नये. त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबुतीने उभी राहिले पाहिजे.
धर्माच्या दंगलीत मेलेल्या माणसाचा उहापोह होतो, पण साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या करतात त्याबाबत कुणी काही बोलत नाही अशी खंतही आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
साडेतीन लाख शेतकऱ्यांची आत्महत्या
बच्चू कडू म्हणाले की, काँग्रेस आणि भाजपा हे दोघं धर्माचे नातेगोते जुळवतात. या भारतात कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ते कटपर्यंत ज्या काही हत्या झाल्या त्या शेतकऱ्यांच्या आणि मजुरांच्या झाल्या. अनेक बेरोजगारांनी आत्महत्या केल्यात. तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा शोधाशोध घेण्यापेक्षा तो मरतोय कोण हे महत्त्वाचं आहे. हे आमचे नेते लोक सांगत नाहीत. एखादा धर्मातला माणूस कुठल्यातरी दंगलीत मेला तर उहापोह होतो, पण साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या करून मरतायत याची साधी बातमी होत नाही याचं दुःख आहे.