Advertisement

 १ कोटीची लाच मागणारा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक फौजदार जाधवर निलंबीत

प्रजापत्र | Thursday, 16/05/2024
बातमी शेअर करा

बीड दि.१६(प्रतिनिधी)- गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला एक कोटी रूपयांची लाच मागितली होती. त्यातील पहिला हप्ता पाच लाख रूपये खासगी इसमाच्या माध्यमातून घेण्यात आले. याप्रकरणी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकासह सहायक फौजदार आणि खासगी इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील निरीक्षक आणि एएसआय फरार आहेत. परंतू पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या दोघांनाही निलंबीत केले आहे.

 

 

हरिभाऊ खाडे पोलिस निरीक्षक आणि सहायक फौजदार आर.बी.जाधवर असे निलंबीत केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला खाडे यांनी १ कोटी रूपयांची लाच मागितली होती. त्यासाठी जाधवर यांनी प्रोत्साहन दिले होते. ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता पाच लाख रूपये घेताना खासगी इसम कुशल जैन याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. त्यानंतर खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार झाले होते. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर लगेच अधीक्षक ठाकूर यांनी या दोघांनाही सेवेतून निलंबीत केले आहे.

 

 

जाधवरच्या घरात २५ तोळे सोने
सहायक फौजदार जाधवर यांच्या घरात तब्बल २५ तोळे सोने सापडले आहे. तसेच रोख १८ हजार एवढी रक्कम मिळाली आहे. ती सर्व जप्त केली आहे.

 

 

खाडेचे घर सील, न्यायालयातून घेणार परवानगी
हरिभाऊ खाडे हे बीडमध्ये किरायाच्या घरात राहत होते. ते पुण्याला असल्याने घर बंद होते. पोलिसांनी ते सील केले असून बाहेर पोलिस कर्मचारी नियूक्त केले आहेत. घर झडतीसाठी न्यायालयात परवानगी मागण्यात आली आहे.

 

 

पुढील कारवाई करू 
लाच प्रकरणातील पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी या दोघांनाही निलंबीत केले आहे. आता पुढील कारवाई होईल.
- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक बीड

Advertisement

Advertisement