पुणे- आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत नवीन प्रवेश प्रक्रिया उद्या शुक्रवार (दि. १७ मे)पासून विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुरू होईल. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज पालकांनी भरले होते. त्या विद्यार्थ्यांचे अर्ज पालकांना पुन्हा भरावे लागणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आरटीई पोर्टलवर जिल्हानिहाय सुधारित शाळांची संख्या आणि प्रवेश क्षमता प्रसिद्ध केली आहे. २०२४- २५या शैक्षणिक वर्षात राज्यातील नऊ हजार १३८ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील एक लाख २ हजार ४३४ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी शुक्रवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने कायद्यात बदल केल्यामुळे केवळ मराठी माध्यमाच्या शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश दिला जात होता. विद्यार्थ्यांच्या घरापासून एक कि.मी. अंतरावर इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसाहाय्यित शाळा असूनही या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने राज्य शासनाच्या ९ फेब्रुवारी २०२४ च्या अधिसूचनेला स्थगिती दिली. त्यामुळे जुन्याच पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याची लिंक बंद आहे. परंतु, पालकांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी शुक्रवारपासून संधी दिली जाणार आहे. पूर्वी राज्यातील ७६ हजार ५३ शाळांमधील आरटीईच्या ८ लाख ८६ हजार ४११ जागांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले. पालकांकडून सरकारी शाळांच्या प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळाला. केवळ ६९ हजार ३६१ पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज केले होते. आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याने अर्जाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.