Advertisement

संपादकीय अग्रलेख- भाजपची गोची

प्रजापत्र | Tuesday, 14/05/2024
बातमी शेअर करा

नरेंद्र मोदींनी आडवाणींसारख्या नेत्यांना मार्गदर्शक मंडळामध्ये पाठविण्यासाठी खेळलेली वयाची खेळी आता स्वतः मोदींच्याच अंगलट येवू शकते त्यामुळे मोदींची गॅरंटी अल्पकालावधीची आहे अशी भूमिका घेत केजरीवालांनी सुरू केलेला प्रचार आता भाजपच्या अडचणी वाढविणारा ठरत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर भाजपमधली अस्वस्थता सातत्याने वाढताना दिसत आहे.

 

लोकसभा निवडणुकीसाठी चारसो पारचे मोठे स्वप्न घेवून आणि तितकाच मोठा गाजावाजा करत मैदानात उतरलेल्या भाजपचा अवसानघात व्हावा अशी परिस्थिती प्रत्येक टप्प्यानंतर समोर येवू लागली आहे. लोकसभा निवडणुक सात टप्प्यात घेण्याची घोषणा निवडणुक आयोगाने केली असली तरी हे सात टप्पे कोणाच्या पथ्यावर पडणार हे जनतेला वेगळे सांगण्याची आवश्यकता मुळातच नव्हती. भाजपने अगदी सुरूवातीपासून या लोकसभा निवडणुकीत आपल्याला विरोधकच नाहीत असे दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, किंबहूना या निवडणुकीत चारशे पेक्षा अधिक जागा भाजप सहज खिशात घालणार आहे असे सांगत भाजपच्या कार्यकर्त्यांना उर्जा देण्याचे काम केले. मात्र अगदी सुरूवातीपासूनच भाजपची गोची होताना दिसत आहे.
ज्या इंडिया आघाडीला सुरूवातीला हिनवण्याचे काम भाजपने केले होते. आता त्याच इंडिया आघाडीची भाजपने किती धास्ती घेतली आहे हे नरेंद्र मोदींच्या प्रत्येक भाषणातून समोर येत आहे. लोकसभा निवडणुकांचे चार टप्पे संपले असून आता आणखी तीन टप्प्यांमधले मतदान बाकी आहे. महाराष्ट्रातील मुंबई, दिल्ली, हरियाणा, पंजाब आदी ठिकाणी मतदान होणार आहे. अर्थात लोकसभेच्या एकुण जागांच्या 50 टक्केंपेक्षा अधिक मतदार संघांमधले मतदान संपल्यानंतर आता भाजपकडे खेळण्यासारखे कोणतेही कार्ड राहिले नसल्याचे चित्र आहे.

 

त्यातच जामिनावर बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे भाजपसाठी अधिक डोकेदुखी ठरणार आहेत. मुळातच भाजपने सर्वत्र केलेला सत्तेचा गैरवापर हाच आता इंडिया आघाडीचा प्रचाराचा मुद्दा झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यानंतर जशी भाजपची धास्ती वाढली आहे आणि त्यांच्या देहबोलीतून ते स्पष्टपणे दिसत आहे. त्याउलट इंडिया आघाडीच्या सर्वच नेत्यांमध्ये प्रत्येक टप्प्यानंतर उत्साह वाढताना दिसत आहे. आता अरविंद केजरीवालांनी थेट मोदी गॅरंटीवरच प्रहार करायला सुरूवात केली आहे. येत्या काही दिवसात नरेंद्र मोदी 75 वर्षांचे होणार आहेत आणि नरेंद्र मोदींनीच भाजपमध्ये निवृत्तीसाठी वयाची पंचाहत्तरी हा निकष लावलेला आहे. अडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा नेत्यांना अडगळीत म्हणा किंवा मार्गदर्शक मंडळात म्हणा टाकण्यासाठी जी खेळी खेळली गेली होती ती आता मोदींवर उलटणार असल्याचा दावा केजरीवाल करीत आहेत. अर्थात भाजप इतका मोठा डाव खेळेल का? किंवा मोदी-शहा पक्षाला त्या अवस्थेत राहू देतील का? हा वेगळा मुद्दा असला तरी मोदींच्या गॅरंटीला उत्तर भारतात सुरूंग लावण्यासाठी हा मुद्दा पुरेसा आहे. त्यामुळे अगोदरच अस्वस्थ होत असलेल्या भाजपची केजरीवालांनी अधिकच गोची केली आहे.

Advertisement

Advertisement