राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. त्यातच बारामतीमध्ये धक्कादायक घडना घडली आहे. बारामती मतदारसंघात 7 मे रोजी मतदान झाले होते. मतदानानंतर बारामतीमधील सर्व मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन्स या एका गोदामातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. ज्या स्ट्राँग रुमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जात आहे. सोमवारी सकाळी स्ट्राँगरुम बाहेर मॉनिटरवर दिसणारे सीसीटीव्ही फुटेज अचानक बंद झाल्याची घटना घडली. हे फूटेज सुमारे ४५ मिनिटे बंद होते. या घटनेबाबत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10.25 वाजल्यापासून बंद आहे. यामागे नेमके काय कारण आहे? मी यासाठी त्या विभागाच्या आरओला फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही. तिकडे टेक्निशियन्स नाहीत, आमच्या लोकांना गोदामापर्यंत जाऊ दिले जात नाही. हे सगळं काय चाललंय, असा प्रश्न लक्ष्मीकांत खाबिया विचारला. सीसीटीव्ही फुटेज बंद असताना काहीतरी काळबेरं होण्याची शक्यता तर नाही ना, असा संशय माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात बळावल्याशिवाय राहत नाही, असेही त्यांनी म्हटले.
साधारण पाऊण तासानंतर स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही फुटेज मॉनिटरवर पुन्हा दिसायला लागले. मात्र, या काळात काही गैरप्रकार तर घडला नाही ना, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून व्यक्त केली जात आहे. या स्टाँग रुमचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद नव्हते, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. सीसीटीव्ही दिसणारी स्क्रिन काही वेळासाठी बंद होती, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.