Advertisement

कमांडर वासूसह दोन महिला नक्षल्यांना कंठस्नान

प्रजापत्र | Monday, 13/05/2024
बातमी शेअर करा

गडचिरोली- सुरक्षा यंत्रणांवर हल्ला चढविण्याच्या तयारीत असलेल्या माओवाद्यांचा कट उधळून लावत सी- ६० जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात पेरिमिली दलमचा प्रभारी व माओवाद्यांच्या विभागीय समितीचा कमांडर वासू याच्यासह दोन महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले. १३ मे रोजी सकाळी भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा येथील जंगलात ही थरारक घटना घडली. 

 

नक्षल्यांचा सध्या टीसीओसी कालावधी सुरु आहे. यात  पेरिमिली दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकून बसल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी विशेष अभियानचे अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी- ६० जवानांच्या दोन तुकड्या  तातडीने परिसरात शोधासाठी रवाना केल्या. पथके परिसरात शोध मोहीम करत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, सी-६० जवानांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर एक पुरुष आणि २ महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले.  पेरिमिली दलमचे प्रभारी आणि विभागीय समितीचा कमांड वासू याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले आहे. इतर दोन महिला नक्षल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

 

 

घातपाताचा होता डाव
दरम्यान, घटनास्थळी  तीन स्वयंचलित शस्त्रे , एक एके ४७, १ कार्बाइन आणि १ इन्सास असे साहित्य व नक्षल साहित्य आढळून आले आहे. हे साहित्य जप्त केले असून परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले  असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

Advertisement

Advertisement