लोकसभा निवडणूक हि लोकशाहीचे ,पर्यायाने देशाचे आणि अंतिमतः प्रत्येक नागरिकाचे, त्याच्या पुढच्या पिढ्यांचेही भवितव्य ठरविणारी असते. लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मागच्या तीन टप्प्यांमध्ये अनेक ठिकाणी मतदानाचे प्रमाण प्रचंड घटले आहे. आपल्याला बहुमताचा लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा असेल तर त्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. ज्याला त्याला आपापल्या राजकीय विचारधारेप्रमाणे मत देण्याचा संवैधानिक अधिकार आहे, पण त्याही अगोदर मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आज ते पार पाडा.
१८ व्या लोकसभेसाठी देशभर सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. देशभरात लोकसभेसाठी सात टप्प्यात निवडणूक होत असून आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांसह देशातील 96 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होणार आहे. त्यामुळे या सर्वच मतदारसंघात, ज्यात बीड देखील आले, आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे.
लोकसभा निवडणूक ही देशातील सर्वोच्च सभागृहात आपले प्रतिनिधी पाठविण्यासाठीची निवडणूक आहे. आपल्याला, म्हणजे प्रत्येक नागरिकाला कसले सरकार हवे आहे, हे ठरविणारी ही निवडणूक आहे. लोकशाहीत बहुमताला महत्व असते, म्हणूनच लोकसभेत निवडून जाणारा प्रतिनिधी त्या भागातील जास्तीत जास्त मतदारांच्या पसंतीने निवडलेला असणे अपेक्षित आहे, आणि यासाठी मतांचा टक्का वाढायला हवा. प्रत्येक मतदारसंघात दुरंगी किंवा तिरंगी लढती गृहीत धरल्या आणि मतदानाचे प्रमाण जर 60ड्ढ च्या आतच राहणार असेल तर निवडून येणारा उमेदवार खर्या अर्थाने किती लोकांचे प्रतिनिधित्व करतो याचे चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत, प्रभावी आणि सक्षम करायची असेल, खर्या अर्थाने लोकांप्रती संवेदनशील करायची असेल, तर मतदान हे प्रत्येकाचे परम कर्तव्य आहे.
मागच्या तीन टप्प्यांमधील निवडणुकीत अनेक ठिकाणी मताचा टक्का मोठया प्रमाणावर ढासळला आहे. जर देशभरात सरासरीच्या 60ड्ढ देखील मतदान होणार नसेल तर हे लोकशाही व्यवस्थेचे देखील अपयश आहे. लोकशाही व्यवस्था मजबूत करायची असेल तर प्रत्येकाचे एक एक मत महत्वाचे असते, म्हणूनच आज कोणी काहीही सांगितले तरी
लोकशाहीमधला सर्वोच्च उत्सव आहे असे समजून मतदान करा.
आपल्यासोबत स्वतंत्र झालेल्या अनेक देशांमध्ये लोकशाहीच्या नरडयाला नख लावण्याचे प्रकार घडलेले आहेत. जिथे लोकशाही नसते तिथे सामान्यांच्या जगण्याच्या हक्काचा देखील कसा संकोच होतो आणि माणूस म्हणून जगण्यात देखील कसे अडथळे येतात हे आपण पाहात आलो आहोत. आज आपल्याही लोकशाही समोर अनेक आव्हाने आहेत. सर्वांना सोबत घेऊन जाणारी, सर्वसमावेशक अशी व्यवस्था असणे आज काळाची गरज झालेली आहे. देश एका संक्रमण अवस्थेतून जात आहे. मागच्या काळात देशाने अनेक संवैधानिक संस्थांचे पतन पाहिले आहे. व्यवस्था कणाहीन कशा होतात हे पाहिले आहे. एकाधिकारशाही, हुकूमशाही कायमच घातक असते, म्हणूनच आपली लोकशाही टिकविणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. लोकशाही व्यवस्थेतील मुल्ये, सर्वसमावेशक विचार, सामुहिक विकासाची भावना आणि संवैधानिक मुल्यांची प्राणपणाने जपणूक करण्याची ही वेळ आहे, आणि ही जपणूक आपण केवळ मतदानाच्या माध्यमातूनच करु शकतो. जात, धर्म, लिंग भेदाच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाच्या मताला समान किंमत आपल्या लोकशाहीने दिलेली आहे. म्हणूनच लोकशाही टिकविण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी, सर्वसमावेशकता अधिक मजबूत करण्यासाठी, जातीय, धार्मिक सलोखा जपणारे एक प्रबळ राष्ट्र निर्माण करण्यासाठी आणि खर्या अर्थाने आपल्या व आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी मतदानाचा क्षण महत्वाचा आहे. तुमची राजकीय विचारधारा कोणतीही असू द्या... पण आज मतदान कराच...