उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरुरचे आमदार अशोक पवार आण शरद पवार यांच्या पक्षाचे लोकसभेचे उमेदवार नीलेश लंके यांना तुम्ही निवडून कसे येता ते बघतोच, असं जाहीरपणे दम दिला. यामुळे आता राज्यभरात यावरुन प्रतिक्रिया उमटत आहेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले, "अजित पवारांना पूर्वीपासूनच दम देण्याची सवय आहे. ती त्यांची पद्धत आहे. त्यांच्या पक्षात जे राहिलेले आहेत, त्या सर्वांना अजित पवारांच्या या पद्धतीची माहिती आहे. प्रत्येकाल ते असेच बोलत असतात. प्रत्येकाला धाकात ठेवत असतात. त्यामुळे मला खात्री आहे की, याची सर्वांना त्यांच्या पक्षातल्या लोकांना सवय झाली असेल. त्यामुळे फारसा परिणाम होणार नाही," अशा शब्दात पाटील यांनी खोचक टोला लगावला.
काय म्हणाले होते अजित पवार ?
अजित पवार यांनी गेल्या तीन दिवसांत राज्यातील दोन आमदारांना दम भरला. यात नगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांचा समावेश आहे. 'नीलेश बेटा, तुझा बंदोबस्तच करतोच', 'तू किस झाड पत्ती है', असे पारनेर विधानसभा मतदारसंघात येऊन अजितदादांनी फटकारले होते. यावर नीलेश लंकेंनी मौन सोडले आहे. "अजितदादांना संपर्क करतो. निवडणूक होऊ द्या," असे नीलेश लंके यांनी म्हटले आहे.