बीड-चोरी, लुटमारी, घरफोड्यांची वाढती संख्या पोलिसांसाठी डोकेदुखी बनत चालली आहे. आता या चोरट्यांची हिंमत वाढली असून त्यांनी चक्क पोलिस निरीक्षकांनाच अडवून लुटले आहे. हातातील दोन अंगठ्या, रोख रक्कम असा ६६ हजार रूपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. ही घटना ५ मे रोजी रात्री साडे अकरा वाजता जिल्हा रूग्णालय परिसरातील रोडवर घडली. या घटनेने पोलिसांचा वचक आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कृष्णा उत्तमराव हिस्वनकर (वय ५६ रा.शहानुरवाडी, छत्रपती संभाजीनगर ह.मु. बिंदुसरा पोलिस अधिकारी कॉलनी, बीड) असे लुटलेल्या पोलिस निरीक्षकांचे नाव आहे. हिस्वनकर हे छत्रपती संभाजीनगर येथे एसआरपीएफ ग्रुप - १४ येथे बिनतारी संदेश विभागात कार्यरत आहेत. सध्या लोकसभा निवडणूक असल्याने ते चार दिवसांपासून बीडमध्ये बंदाेबस्तासाठी आलेले आहेत.
५ मे रोजी रात्री साडे अकरा वाजता हिस्वनकर हे जिल्हा रूग्णालयाच्या बाजुच्या रस्त्याने बिंदुसरा कॉलनीकडे जात होते. याचवेळी दुचाकीवरून दोघे आले. त्यातील एकाने हिस्वनकर यांना पकडून ठेवले तर दुसऱ्याने त्यांच्या हातातील दोन अंगठ्या, रोख पाच हजार रूपये असा ६६ हजार रूपयांचा मुद्देमाल घेऊन धुम ठोकली. त्यानंतर ७ मे रोजी बीड शहर पोलिस ठाणे गाठत हिस्वनकर यांनी अज्ञात दोन चोरट्यांविरोधात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंद झाला आहे.