एकीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी उद्धवस्त झाली आहे, त्यांचा दिवा विझला आहे असे सांगायचे आणि पुन्हा काँग्रेस सत्तेत आली तर अमुक अमुक गोष्टी करेल अशी भीती देखील घालायची असा दुटप्पीपणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. विकसित भारताच्या संकल्पाची गोष्ट करायची आणि पुन्हा राम मंदिर, पाकिस्तान याच मुद्द्यांवर बोलायचे हेच धोरण पंतप्रधान मोदींनी ठरवले आहे. त्यामुळे भाजपला आता खरोखर काँग्रेसची धास्ती वाटत आहे का हा प्रश्न कोणालाही पडत आहे.
देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या. महाराष्ट्रातील अहमदनगर आणि बीड लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या. खरेतर देशाचे पंतप्रधान प्रचार सभेला आल्यामुळे ते किमान राज्याला काय देऊ याबद्दल काही बोलतील असे वाटणे साहजिक होते , मात्र त्यांच्या पूर्वानुभवाप्रमाणे तसली काही अपेक्षा फोल ठरली. स्वतः सत्तेत येऊन एक दशक झाल्यानंतरही काँग्रेसने कसा विकासाला विरोध केला , काँग्रेसने कसा भ्रष्टाचार केला वगैरे नेहमीचेच भाषण पंतप्रधान मोदी करीत आहेत.
हे करताना एकीकडे मोदी, देशात केवळ भाजपचिंच, त्याहीपेक्षा मोदीचीच हवा असल्याचे ठामपणे सांगत. इंडिया आघाडीचे काही खरे नाही, तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर या आघाडीची सारी स्वप्ने धुळीस मिळावी आहेत, आघाडी उद्धवस्त झाली आहे असे मोदी ठिकठिकाणी सांगत होते. मोदी म्हणतात तसेच जर खरोखर असेल तर मग मोदींनी मतदारांना आपण दहा वर्षात काय काय केले आणि पुढे काय करणार आहोत या हे सांगायला पाहिजे होते. त्यावर मते मागायला पाहिजे होती. जी आघाडी मोदी म्हणतात त्याप्रमाणे उद्धवस्त झाली आहे, ती सत्तेत आल्यास काय काय होईल हे आज सांगण्यात तसा काहीच अर्थ नाही.
कारण जर विरोधकांचे आव्हानच शिल्लक नसेल तर विरोधक सत्तेत आले तर अमुक अमुक करतील असे सांगण्याची मुळात आवश्यकताच काय ? पण तरीही मोदींच्या भाषणातील बहुतांश भाग काँग्रेस आणि इंडिया आघाडी सत्तेत आली तर काय काय होईल हेच सांगण्यात जात आहे. महाराष्ट्रातील प्रचारसभांमध्ये बोलताना तर मोदींनी इंडिया आघाडी सत्तेत आली तर सीएए , तिहेरी तलाक विरोधी कायदा, कलम ३७०-रद्द करण्याचा निर्णय रद्द करतील असे तर सांगितलेच , त्यासोबतच काँग्रेस सत्तेत आली तर राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालायाचा निर्णय देखील काँग्रेस बदलेल असे सांगायलाही पंतप्रधान विसरले नाहीत. म्हणजे काँग्रेसची किंवा इंडिया आघाडीची किती भीती पंतप्रधान घालू पाहत आहेत ? सुरुवातीला आपल्यासमोर विरोधकच नाही असे म्हणणारे , राहुल गांधींची तर उडविणारे नरेंद्र मोदी आता प्रत्येक भाषणातील किमान ५-१० मिनिट 'शहजादा ' म्हणून काह होईना पण राहुल गांधींवर खर्ची घालत आहेत, या साऱ्याच्या अर्थ काय घ्यायचा ?
या साऱ्या प्रचाराचं अर्थ एकच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या संदर्भाने चांगलाच धास्तावला आहे. मागच्या काही काळात भाजपची चारसोपार ची घोषणा आता मंदावली आहे. देशातले वातावरण खरोखर काय आहे, भाजपच्या विरोधात किती रोष आहे, याची जाणीव एव्हाना भाजपला झालेली आहे. चारसोपार तर दूर, २०१९ मध्ये होत्या तेव्हढ्या जागा देखील राखण्याचे आव्हान आज भाजसमोर आहे हे भाजपनेत्यांच्या देखबोलीतूनच स्पष्ट दिसत आहे. आणि म्हणूनच देशाला काँग्रेसची भिती दाखविली जात आहे. पुन्हा ठेवणीतले काँग्रेसवरचे अतिरेक्यांशी जवळीक असण्याचे आरोप आहेतच, जोडीला पाकिस्तानचा उल्लेख प्रत्येक भाषणात आवर्जून केला जातोय आणि काँग्रेस सत्तेत आली तर देशाचे कसे वाटोळे होईल हे सांगितले जात आहे. म्हणजे काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता आहे असे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत आहे का ? त्यांचा सारा प्रचार असा नकारात्मक होण्यामागे त्यांनी काँग्रेसची घेतलेली धास्ती आहे का ?