भाजप एकीकडे मागच्या दहा वर्षात देशात मोठ्याप्रमाणावर विकास कामे झाल्याचे सांगते, महाराष्ट्रातही महाविकास आघाडीची कोरोना काळातली अडीच तीन वर्षाची सत्ता सोडली तर ६ वर्षांपेक्षा अधिक काळ भाजप सत्तेत आहेच. देवेंद्र फडणवीस आणि इतर मोठं मोठे नेते महाराष्ट्र भाजप किंवा महायुतीकडे आहेत, तरीही लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात वीस पेक्षा अधिक सभा घ्याव्या लागत आहेत. जर देशभर भाजपची हवा आहे , महाराष्ट्रात फार चांगले काम स्थानिक नेतृत्वाने केले आहे, तर मग मोदींना इतके फिरण्याची वेळ का आली आहे ?
भाजपने नेहमीच काँग्रेसच्या एकछत्री नेतृत्वावर टीका केली आहे. काँग्रेसवर गांधी परिवाराचा असलेला पगडा भाजपला परिवारवाद वाटत आला. त्यावरून आजही भाजपचे नेते, अगदी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर लोक काँग्रेसवर टीका करीत असतात, हा तर कोडगेपणाचा कळस आहे पण त्यापलीकडे जाऊन आज भाजपसमोर मोदींशिवायचा चेहरा कोणता हा प्रश्न आहे . मोदी काँग्रेसला आणि इंडिया आघाडीला तुमचा नेता कोण असा प्रश्न अजूनही विचारतात , मात्र ज्या भाजपने सामान्यांना नेतृत्व दिल्याच्या गमजा मारल्या आहेत, त्या भाजपची परिस्थिती काय आहे ?
देशाचे फारच दूर राहिले, महाराष्ट्रापुरता विचार केला तरी काय दिसते ? महाराष्ट्रात दोन टप्प्यांमधील प्रचार संपलेला आहे, तिसऱ्या टप्प्यातील प्रचार वेगात आहे , राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. आजपर्यंत मोदींच्या महाराष्ट्रात भरपूर सभा झाल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपेल त्यावेळी मोदींनी निवडणूक प्रचाराच्या १२ सभा महाराष्ट्रात घेतलेल्या असतील आणि सर्व टप्पे संपेपर्यंत मोदी महाराष्ट्रात किमान २० सभा घेतील असे नियोजन आहे. हे सारे कशासाठी तर मोदींना आणि भाजपला , महाराष्ट्रात किमान ४५ जागा जिंकायच्या आहेत. महाराष्ट्राचे राजकीय चित्र पाहू गेल्यास आज घडीला स्वतः भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी , एकनाथ शिंदेंची शिवसेना, जोडीला मनसे ,रिपाई , रासप आणि इतर काही पक्ष अशी महायुती आहे. अगदी चार महिन्यापुर्वीपर्यंत महायुतीचे नेते, आम्हाला राज्यात कोणी विरोधकच शिल्लक नाही, महाविकास आघाडीला उमेदवार मिळणार नाही असे सांगत होते, जे जे म्हणून कोणी उमेदवार होऊ इच्छित होते, त्यांना आपल्याकडे कसे ओढत येईल यासाठी सारी शक्ती पणाला लावली गेली. एका अर्थाने महाराष्ट्रावर मंहायुतीचा एकछत्री अंमल आहे असे चित्र रंगविलें गेले. मात्र आज परिस्थिती काय आहे? राज्यात महाविकास आघाडीने महायुतीला कडवे आव्हान निर्माण केले आहे. भाजपने अनेक पक्षांमधील नेते आपल्याकडे ओढले असतील, पण जनतेचे काय ? त्या जनतेला स्वतःकडे घेता येत नाही हे आता भाजपला समजले आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रासारख्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना २० सभा घ्याव्या लागणार आहेत.
महायुतीकडे देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवले, आता राज ठाकरे , वेगवेगळ्या पक्षातून आयात केलेले अशोक चव्हाणांसारखे आणखी काही नेते अशी सारी फौज असतानाही सभांचा धडाका मात्र मोदींना लावावा लागत असेल तर स्थानिक नेत्यांचे कर्तृत्व थिटे पडले आहे का ? मागच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने फार चांगली कामगिरी केली असेल तर त्या कामगिरीच्या जोरावर आणि स्थानिक चेहऱ्यांना समोर करून भाजपला प्रचार राबवता का येत नाही ? जास्तीत जास्त मतदारसंघांमध्ये मोदींना मागणी आहे , हे मोदींची लोकप्रियता म्हणून ठीक आहे, पण राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती असले काही तत्वज्ञान सांगणाऱ्या भाजपला सगळीकडेच मोदींनाच का फिरवावे लागत आहे, म्हणजे पक्षापेक्षाही व्यक्तीचा चेहरा पुढे करण्याची जी मजबुरी भाजपसमोर आली आहे, त्यात स्थानिक नेत्यांचे अपयश आहे असे पक्षाला वाटत नाही का ? पंतप्रधान पदावरील व्यक्तीने किती सभा घ्याव्यात आणि एकेक राज्यात कितीवेळा जावे याचे काही नियम नाहीत, असण्याचे कारण देखील नाही, मात्र आम्हीच सर्व शक्तिमान असा दावा करणाऱ्या पक्षाला इतके हतबल का व्हावे लागत आहे . भाजपकडे नेतृत्वाची खान आहे, एकास एक भरावी नेते आहेत असे जे सांगितले जात होते ,त्या सांगण्याचे काय झाले ? या सर्वच अर्थ परिस्थिती भाजपला वाटते किंवा भाजप दाखवीत होता तशी नाही, किमान महाराष्ट्रात तरी भाजपला किंवा महायुतीला फार अनुकूल नाही असाच आहे आणि भाजपच्या स्थानिक नेतृयत्वाच्या मर्यादा यामुळे अधिकच उघड्या पडल्या आहेत.