Advertisement

गळफास घेऊन प्रचार्याची आत्महत्या

प्रजापत्र | Wednesday, 24/04/2024
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.२४(प्रतिनिधी)- श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाजोगाई संचलित बी.एड.कॉलेजचे प्राचार्य डॉ.नंदकिशोर फुलारी यांनी आज सायंकाळी 4:30 वाजता महाविद्यालयाच्या कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

आज सायंकाळी 4 वाजता महाविद्यालयाचे नियमित कामकाज व्यवस्थितपणे करून सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतर लगेचच प्राचार्य डॉ.फुलारी यांनी ही आत्महत्या केली असल्याचे समजते. महाविद्यालयाच्या इमारतीची झाडझुड करीत सेवक प्राचार्य डॉ.फुलारी यांच्या पारदर्शक कॅबिन पर्यंत पोहोचताच त्यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आली आणि त्याने ही माहिती तात्काळ संस्थेच्या इतर कर्मचारी व संचालकांना दिली. प्राचार्य डॉ.नंदकिशोर फुलारी हे गेली अनेक वर्षांपासून या संस्थेने सुरू केलेल्या विविध शैक्षणिक युनीट मध्ये कार्यरत होते. या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून त्यांच्याकडे बऱ्याच वर्षांपासून प्राचार्यपदाची जबाबदारी होती. श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध उपक्रमातील एक गुणवान, हुषार, अभ्यासू आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे प्राचार्य म्हणून डॉ.नंदकिशोर फुलारी यांची ओळख होती. संस्थेच्या सर्वच उपक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. प्राचार्य डॉ.नंदकिशोर फुलारी यांनी नव्यानेच बांधलेल्या घराची वास्तुशांती याच महिन्यात 6 तारखेला झाली होती. सर्व व्यवस्थित सुरू असताना प्राचार्य डॉ.नंदकिशोर फुलारी यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कक्षातच आत्महत्या का केली असा प्रश्न आता समोर आला आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन अहवालासाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात हलविले आहे. या अहवालानंतर व पोलिस तपासात प्राचार्य डॉ.नंदकिशोर फुलारी यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजेल. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement