Advertisement

संपादकीय अग्रलेख-सहन होईना अन् सांगता येईना

प्रजापत्र | Saturday, 20/04/2024
बातमी शेअर करा

        धाराशिव लोकसभेच्या जागेसाठी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 'मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी आम्ही अर्चना पाटील यांना मताधिक्य देऊ, पण असाच शिवसेनेचा एकेक मतदारसंघ कमी झाला, ते शिवसैनिक  सहन करणार नाही' अशी खदखद व्यक्त केली. अशीच खदखद महायुतीमध्ये अनेक ठिकाणी आहे. मात्र तानाजी सावंत काय किंवा आणखी कोणी, त्यांच्याकडे सहन करण्यापलिकडे पर्याय काय आहे? महायुतीमधील बहुतेकांची अवस्था सहन होईना आणि सांगता येईना अशी झाली आहे.
 

 

        महायुतीच्या जागावाटपाचा काही जागांवरचा तिढा अजूनही सुटलेला नाही. जिथे जागावाटप जाहीर झाले आहे, तिथे दिलजमाई झाली आहे असे नाही. याचे प्रत्यंतर अनेक ठिकाणी येत आहे. महायुतीमध्ये भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत भलेही घेतले असेल, मात्र त्यांना  त्यांची 'जागा' देखील दाखवून दिली आहेच.
मुळातच भाजपचे सुरुवातीपासुनच धोरण मित्र पक्षांना कमजोर करून त्यांच्या जागा स्वतःकडे घेत स्वतःचा विस्तार करण्याचेच राहिलेले आहे. अगदी बीड सारख्या जिल्ह्यात सुरुवातीला जेव्हा भाजप शिवसेना युती झाली, त्यावेळी शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या विधानसभा मतदारसंघांची संख्या आणि त्यानंतर गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा म्हणून शिवसेनेला केवळ एका जागेवर मानावे लागलेले समाधान खूप काही सांगून जाते.  आता तर हा सारा पक्षच अधिकच विस्तारवादी असलेल्या मोदी-शहांच्या हातात गेलेला आहे आणि महाराष्ट्रात मोदी शहांच्या  जोडीला फडणवीस आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा कोणीच काहीच ठेवू शकत नाही. मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांना, त्यातही तानाजी सावंत यांच्यासारख्यांनी भाजपकडून असे अनेक धक्के आणखी सहन करायचे आहेत. युतीच्या राजकारणात धाराशिव  (मतदारसंघ म्हणून उस्मानाबाद ) मतदारसंघात सातत्याने शिवसेना निवडणूक लढवित आलेली आहे, मात्र महायुतीमध्ये हा मतदारसंघ गेला तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आणि त्यातही उमेदवारी मिळाली ती भाजपमध्ये असलेले  राणा जगजितसिंह यांच्या पत्नी  अर्चना पाटील यांना, त्यासाठी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेशाची औपचारिकता काय ती पूर्ण केली. पण यात नुकसान झाले ते शिवसेनेचे. त्यामुळे तानाजी सावंत यांनी खदखद व्यक्त करणे साहजिक आहे. पण सावंत काय किंवा अगदी खुद्द एकनाथ शिंदे देखील काय, 'आम्ही सहन करणार नाही' असे केवळ बोलू शकतात , शिवसैनिकांची समजूत काढायची तर त्यांना तेवढे तर बोलावेच लागेल. तसे नसते तर हिंगोलीच्या जाहीर केलेला उमेदवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने बदललाच नसता, भावना गवळींची उमेदवारी कापली नसती आणि आतापर्यंत श्रीकांत शिंदेंच्या प्रचाराचे किमान दोन टप्पे तरी पूर्ण झाले असते. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एक नेते असलेल्या माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी मागच्या काही काळात याबाबत सातत्याने घरचा आहेर दिला. मात्र भाजप म्हणेल तसे चालण्या पलिकडे आज तरी शिवसेनेसमोर पर्याय राहिलेला नाही हेच वास्तव आहे.

 

 

कारण एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच आमदार भाजपसोबत गेले ते काही केवळ स्वाभिमान म्हणून नाही, तर त्यांची अपरिहार्यता काय होती हे आता राज्याला समजलेले आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे तरी किमान त्यातल्या त्यात बरे आहे. आपल्या किमान काहींची उमेदवारी वाचविण्यात ते यशस्वी तरी झाले आहेत. धाराशिव राखता आले नसले तरी किमान छत्रपती संभाजीनगर  आज तरी त्यांनी उमेदवारी मिळविण्यात तरी  वाचविले आहे. पण अजित पवारांचे काय? त्यांच्या पक्षाला राज्यात केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे आणि त्यातही शिरूरमध्ये शिवसेनेतून आयात केलेला तर धाराशिवमध्ये भाजपमधून आयात केलेला उमेदवार द्यावा लागला आहे. बाकी राज्यातील बहुतांश ठिकाणी त्यांना म्हणजे राष्ट्रवादीला, त्यांनी आतापर्यंत ज्यांना विरोध केला त्यांच्याच पालख्या उचलायच्या आहेत. तानाजी सावंत किमान 'शिवसैनिक हे सहन करणार नाही' असे भाषणात का होईना, बोलू तरी शकतात. अजित पवारांची आणि त्यांच्या पक्षाची अवस्था तर तितकीशी राहिलेली नाही. कितीही सहन होत नसले शिवसेना काय किंवा राष्ट्रवादी काय, भाजपसोबत फरफटत जाणे हेच त्यांचे प्राक्तन आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकांमध्ये स्वतःचे पक्ष वाचविण्यासाठी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना काय काय करावे लागणार आहे, याचीच ही रंगीत तालीम आहे. सहन ही होत नाही आणि सांगता देखील येत नाही अशा अवस्थेत राहायचे तरी किती काळ?
 

Advertisement

Advertisement