Advertisement

काँग्रेसला दोनपेक्षा अधिक जागा वंचितला द्यायच्याच नव्हत्या

प्रजापत्र | Saturday, 13/04/2024
बातमी शेअर करा

केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे जाहीर करत काँग्रेस, शिवसेनेने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र प्रत्यक्षात जागा वाटपाची वेळ आली त्यावेळी वंचित बहुजन विकास आघाडीला काँग्रेसला दोन पेक्षा अधिक जागा द्यायच्याच नव्हत्या, असा आरोप वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. भाजप बरोबर महाविकास आघाडीची मॅच फिक्सिंग असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

 

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची उमरखेड येथे प्रचारसभा झाली. त्यामध्ये आंबेडकर बोलत होते. यावेळी आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडक शब्दात समाचार घेतला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मॅच फिक्सिंग असा शब्द वापरला.दुर्दैवाने महाविकास आघाडीनेच तो शब्द प्रत्यक्ष महाराष्ट्रात उतरवला असं मी मानतो. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जो उमेदवार देण्यात आला आहे, तो उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाविरोधात लढू शकत नाही, असं कल्याणमधील माणसंच म्हणत आहेत.

 

 

नाना पाटोले यांना उमेदवारी जाहीर झाली आणि विड्रॉल झाली.नांदेडमध्ये जो उमेदवार दिला तो आठवड्यातून तीन दिवस डायलिसिसवर असतो. तो निवडणुकीत प्रचार करेल की तब्बेत सांभाळेल? अशी अनेक उमेदवारांची उदाहरणे देऊ शकतो. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात अनेक ठिकाणी मॅच फिक्सिंग झाली आहे, असा आरोप माझा आहे. रामटेक मधील काँग्रेस मधील उमेदवार याचं कास्ट सर्टिफिकेट टिकणार नाही हे सर्वांनाच माहीत होतं तरीही जबरदस्तीने त्यांना उमेदवारी दिली. ऐनवेळी उमेदवारी रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वे यांच्या पतीला उमेदवारी जाहीर केली.

Advertisement

Advertisement