Advertisement

संपादकीय अग्रलेख - बेरोजगारीचा अजगर

प्रजापत्र | Saturday, 13/04/2024
बातमी शेअर करा

देशात मोदींची राजवट आल्यापासून सारे कसे भरभराटीचे आहे आणि देशाचा 'अमृतकाळ ' कसा सुरु झाला आहे, हे सांगण्यात भक्तलोकांची ऊर्जा खर्ची पडत असतानाच आता देशातील आयआयटीमध्ये  देखील बेरोजगारीचे संकट उभे पाहिल्याचे चित्र आहे. ज्या आयआयटीमध्ये केवळ प्रवेश मिळाला तरी उज्वल भवितव्याची खात्री दिली जायची, येथील पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी धारकांना नोकरी मिळाय नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बेरोजगाराईचा अजगर आता आणखी कोणाकोणाला आपल्या कवेत घेऊन त्याचा जीव घेणार आहे हा मोठा प्रश्न आहे.
 

 

आयआयटीमध्ये प्रवेश मिळवुइवण्यासाठी आताशा अगदी सहावी सातवीपासूनच पालक आपल्या पाल्याला 'दिशा ' देण्याचे प्रयत्न कसे करतात आणि कोटा सारख्या गावांमध्ये आता अगदी १३-१४ वर्षाची लेकरं देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमधून कशी येतात हे आपण पाहत आहोतच. आयआयटीला प्रवेश मिळाला नाही म्हणजे सारं काही संपलं असे समजून होणाऱ्या आत्महत्या आयआयटीसारख्या क्षेत्राची सामन्यांमध्ये किती क्रेझ आहे हे सांगायला पुरेशा आहेत. त्याला कारण देखील तसेच आहे. आयआयटी सारख्या संस्थांनी आजपर्यंत आपला जो वकूब निर्माण करून ठेवला आणि वाढविला आहे, त्यामुळे आयआयटीमधून एकदा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळाली म्हणजे आयुष्य 'सेट ' झालं अशी एक मानसिकता झालेली आहे. आयआयटीमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारे पगार , समाजात त्यांना मिळणार मान आणि एकूणच आयआयटीयन्सच जीवनमान हे सारं कोणालाही भुलवणारं राहिलेलं आहे.

 

 

त्याच आयआयटीच्या संदर्भाने आता समोर येत असलेलं चित्र भयानक आणि धक्कादायक असं आहे. खरेतर आयआयटीमधील विद्यार्थ्यांना ते शेवटच्या वर्षाला असतानाच नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या असतात. कितीतरी कमानी आयआयटीएन्स आपल्याकडे यावे यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र दिल्लीसारख्या आयआयटीमध्ये आता बेरोजगारीचा दर वाढत आहे. आयआयटीमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरीच्या शोधात भटकावे लागत आहे.पदवीधरांचे तरी काहीसे बरे आहे, पण पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी धारकांचे हाल अधिक आहेत. दिलोईसारख्या आयआयटीमध्ये पदव्युत्तर आणि पीएचडी धारक विद्यार्थ्यांसाठी यावर्षी कॅम्पस मुलाखतीसाठी कोणी फिरकलेच  नसल्याचे चित्र आहे. देशाच्या इतर भागातील आयआयटीची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.
पदव्युत्तर किंवा पीएचडीचा शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जास्त संधी असते, विदेशातील कंपन्या येत असतात, मात्र यावर्षी विदेशातील कंपन्या आलेल्या नाहीत, आपल्या देशातील औद्योगिंक उत्पादन वेगाने घटत आहे, त्यामुळे तेथील मनुष्यबळ कमी लागत आहे. त्याचा एकूणच परिणाम आयआयटीससारख्या क्षेत्रावर होत आहे. देशाच्या अमृत काळात रोजगार निर्मितीची अवस्था ही अशी आहे. यापूर्वी असंघटित क्षेत्रातील रोजगार किंवा अगदी पारंपरिक शिक्षण घेऊन पाडव्याचे भेंडोळे घेत फिरणाऱ्या बेकारांच्या तांड्यांबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या. मात्र त्यावेळी 'स्किल्ड मनुष्यबळ ' कमी आहे असे उत्तर दिले जायचे, आता आयआयटीमध्येही बेरोजगारांचा राहणार असतील तर देशाचा विकास नेमका कोणत्या दिशेने सुरु आहे? मागच्या दहा वर्षात बेरोजगारीचा दर सातत्याने वाढत आहे. मोदी सरकारने देशात प्रतिवर्षी कोट्यवधी रोजगार निर्माण करण्याची घोषणा केली होती, तीकेव्हाच हवेत विरली आहे. मेक इन च्या घोषणांचे ढोल किती पोकळ होते हे देखील लपून राहिलेले नाही. त्यामुळे बेरोजगारीचा अजगर आता देशालाच गुदमरायला लावणार आहे. 

Advertisement

Advertisement