Advertisement

 लोकसभा निवडणुकीमुळे ‘पीएसआय’च्या शारीरिक चाचणी लांबणीवर

प्रजापत्र | Thursday, 11/04/2024
बातमी शेअर करा

पुणे- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा- २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी १५ एप्रिल ते २ मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे ही शारीरिक चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतला आहे. एमपीएससीने या संदर्भात प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली.

 

 

राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलीस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यामुळे १५ एप्रिल ते २ मे या कालावधीत होणाऱ्या शारीरिक चाचणीसाठी पोलीस अधिकारी, तसेच इतर मनुष्यबळ पुरवणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी एमपीएससीला कळवले आहे. या पार्श्वभूमीवर १५ एप्रिल ते २ मे या कालावधीतील नियोजित शारीरिक चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम एमपीएससीच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

 

 

राज्यातील हजारो उमेदवार पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी प्रयत्नशील असतात. २०२१च्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या भरती परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तीन वर्षांनी जाहीर करण्यात आली आहे. तर आता २०२२च्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या परीक्षेच्या उमेदवारांनाही आता प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

Advertisement