Advertisement

 लोखंडी रॉडने मारहाण,मला बेघर केलं !

प्रजापत्र | Thursday, 11/04/2024
बातमी शेअर करा

वर्धा लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रामदास तडस यांच्यासमोर महाविकास आघाडीचे अमर काळे यांचे आव्हान आहे. अशातच भाजपचे उमेदवार रामदास तडस यांचा कौटुंबिक वाद उफाळून आला असून रामदास तडस यांच्या सुनेने रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.भाजप खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज तडस यांच्या पत्नी पूजा तडस यांनी कौटुंबिक हिंसाचार झाल्याचे गंभीर आरोप करत वर्ध्यातून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेत तडस कुटुंबावर गंभीर आरोप केले.

 

 

काय म्हणाल्या पूजा तडस?

"मागील काळात बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझासोबत लग्न झालं. लग्नानंतर मला एका फ्लॅटवर ठेवण्यात आलं. मला अनेकदा लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. माझे १७ महिन्याचे बाळ आहे. हे बाळ माझे नाही म्हणत डीएनए करण्याची मागणी करतात. माझी चुक काय? माझा अपराध काय? मी कोणाकडे न्याय मागणार? मला न्याय द्या, माझ्या बाळाला न्याय द्या," असे पूजा तडस यावेळी म्हणाल्या.

 

 

सुषमा अंधारे आक्रमक!

"पुजा तडस यांचे मागील वर्षी कारवाईच्या भीतीने लग्न केले. त्यांचा छळ केला गेला. आता पूजा तडस या आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहचल्यात. मोदी का परिवार म्हणणाऱ्या भाजपच्या अनेक नेत्यांचे किस्से निघतील. २० तारखेला पंतप्रधान येणार आहेत. त्यांनी 20 या महिलेला वेळ द्यावा अशी मागणी करत भाजपने तडस यांची उमेदवारी रद्द करावी," असे सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.

 

 

रामदास तडस, पंकज तडस यांची प्रतिक्रिया..

दरम्यान, यावर बोलताना भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. याबाबत अधिक काही बोलू शकत नाही. माझा या केसशी काही संबंध नाही मात्र ऐन निवडणुकीवेळीच हा वाद कसा समोर आला. विरोधकांना हाताशी धरुन प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच पंकज तडस यांनीही हा हनी ट्रॅपचा प्रयत्न आहे, असे गंभीर आरोप केले आहेत.

Advertisement

Advertisement