Advertisement

"घडयाळ नको, बाण पाहीजे" म्हणत शिवसेना कर्यकर्त्यांची मुंबईकडे धाव

प्रजापत्र | Monday, 08/04/2024
बातमी शेअर करा
परंडा दि. ८ प्रतिनिधी -शिवसेना शिंदे गटाच्या हजारो कार्यकर्त्यांसह घड्याळ नको बाण पाहीजे च्या घोषणा देऊन दि. ८ रोजी मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस ला जाहीर झालेली उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी ही शिवसेनेलाच मिळावी यासाठी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे.
     
 
  उस्मानाबाद लोकसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच महायुतीकडून ऐनवेळी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या साम्राज्याला धक्का देत उस्मानाबादच्या लोकसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बहाल केली.  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने ऐनवेळी तुळजापूरचे भाजपाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी सौ.अर्चनाताई पाटील यांना पक्षात पक्षप्रवेश देऊन यांच्या नावावर शिक्का मोर्तब केले. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसला उस्मानाबादची जागा सुटल्याने शिवसेना शिंदे गटात मोठा असंतोष पसरला. या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उस्मानाबाद हि शिवसेनेची परंपरागत हक्काची जागा असून कुठल्याही परिस्थितीत आम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काम करणार नाही. असा पवित्रा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतला आहे. काहीही झाले तरी धाराशिव लोकसभेसाठी शिवसेनेचाच उमेदवार देण्यात यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे उस्मानाबादच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाला विरोध करत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शिवसेनेत राजीनामा नाट्य सुरू आहे. शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून ठिकठिकाणी राजीनाम्याची होळी देखील केली जात आहे. मात्र शिवसेना पक्ष श्रेष्ठीकडून या प्रकरणाची दखल घेतली जात नसल्याने शेवटी आज सोमवारी शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार धनंजय सावंत यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून शिंदे गटाच्या हजारो गाड्यासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शिवसेनेच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे.

Advertisement

Advertisement