Advertisement

तोतया पोलिसांनी ४ लाख ८५ हजाराचे दागिने लांबविले !

प्रजापत्र | Friday, 05/04/2024
बातमी शेअर करा

केज  - भोसा (ता. पंढरपूर) येथून परभणीकडे  दुचाकीवरून निघालेल्या एकास पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून आचारसंहितेचे कारण पुढे करीत खिशातील पत्नीचे दागिने, हातातील अंगठ्या व ब्रासलेट काढून बॅगमध्ये ठेवण्यास लावून हात चलाखीने हे ४ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे दागिने घेऊन पसार केल्याची घटना केज - कळंब रस्त्यावर मांगवडगाव शिवारात घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

 

 

 

  अधिक माहिती अशी कि, धाराशिव जिल्ह्यातील कडकनाथवाडी (ता. वाशी) येथील नंदकुमार माणिकराव कुलकर्णी (वय ५२) हे सध्या परभणी शहरात रचना नगर भागात वास्तव्यास आहेत. ते साडूच्या मुलाच्या लग्नासाठी दुचाकीवरून तर त्यांची पत्नी बसने भोसा (ता. पंढरपूर) १ एप्रिल रोजी गेले होते. ३ एप्रिलचे लग्न आटपून ४ एप्रिलला सकाळी ५.४५ वाजता भोसा येथून नंदकुमार कुलकर्णी हे परभणीकडे निघाले होते. त्यांनी पत्नी बसने येणार असल्याने पत्नीचे चार तोळ्याचे सोन्याचे गंठण व अडीच तोळ्याचा सोन्याचा राणीहार घेऊन पॅन्टचे वॉच पॉकेटमध्ये ठेवला होता. सकाळी ९.३० वाजेच्या केज - कळंब रस्त्यावरील मांजरा नदीचा पूल ओलांडून मांगवडगाव शिवारात आनंद हॉटेलचे समोर प‌‌द्मावती मंगल कार्यालयाजवळ आले. त्यांच्या पाठीमागे कळंबकडून दुचाकीवर आलेल्या दोन लोकांनी हाताचा इशारा करुन दुचाकी  थांबविण्यास सांगितली. त्या लोकांपैकी एकाचे अंगावर इटकरी रंगाची पॅन्ट व पांढरा हाफ शर्ट व दुसऱ्याच्या अंगावर क्रीम कलरची पॅन्ट व पांढरा हाफ शर्ट होते. अंगाने जाड व उंच व रंगाने गोरे होते. त्यांचे वय अंदाजे ३५ ते ४० दरम्यान होते.  त्यांनी पोलीस ड्रेसवरील ओळखपत्र दाखवून आचारसंहिता चालू असल्याने तुमची बॅग चेक करायची आहे, असे म्हणाल्याने त्यांनी बॅग दाखविली. त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या पाहून आचारसंहिता चालु असल्याने सोने घालता येत नाही, ते काढुन बॅगमध्ये ठेवा असे म्हणाले. त्यांनी हातातील चार अंगठ्या व ब्रासलेट काढून  बॅगमध्ये ठेवले. त्यानंतर त्यांनी खिसे चापचून वॉच पाकिटमधील पत्नीचे गंठन व राणीहार बॅगमध्ये ठेवण्यास सांगितल्याने तो काढुन बॅगमध्ये ठेवला. त्यानंतर त्यांनी हात चलाखीने हे ४ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे दागिने घेऊन निघून गेले. त्यांनी बॅगमध्ये दागिने आहेत का ? याची खातरजमा केली. मात्र दागिने नसल्याने त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर जवळच नदीवर चेक पोस्टवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी युसुफवडगाव पोलिसात तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात कलम ४२०, १७०, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

Advertisement