डी.डी.बनसोडे
केज दि.१६ -एखाद्या व्यक्तीचे, संस्थेचे एखाद्या क्षेत्रात काम असेल तर त्याचा गौरव होणे किंवा समाजाने त्याची दखल घेणे अपेक्षितच असते , मात्र एखाद्याचा सन्मान करताना तो सन्मान वाटला पाहिजे. सन्मानाला खिरापतीचे स्वरूप आले , तर ज्यांना हे सन्मानपत्र दिले जाते, त्यालाही त्याचे काही वाटत नाही. सध्या 'कोरोना योद्धा ' नावाने सन्मानपत्राची जी खिरापत वाटली जात आहे, त्यामुळे खऱ्या खुऱ्या कोरोना योध्यांचा अवमान होत असल्याचे चित्र आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोणालाही 'कोरोना योद्धा ' म्हणून गौरविण्याचा फ़ंडा या संकल्पनेलाच अवमान करणारा आहे.
सीमेवर लढणारे, स्वतः चा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचे प्राण वाचवणारे, समाजासाठी काहीतरी मोठे योगदान देणारे, आपापल्या क्षेत्रात अतिउच्च कामगिरी करणाऱ्या धाडसी अथवा योद्धे अशी उपाधी समर्पकरित्या दिली जाते. त्या त्या संबंधित व्यक्तींनी केलेले काम समाजाच्या डोळ्यात भरलेले असते. कांही काळ जरी ते दुर्लक्षित राहिले तरी एक ना एक दिवस त्यांची कामगिरी सर्वदूर पसरते. आणि याचीच दखल घेत सरकार किंवा नावलौकिक मिळवलेली सामाजिक संस्था त्यांची दखल घेऊन यथोचित सन्मानित करत असते. आणि अश्या सन्मानाचे अप्रूप घेणाऱ्याला, देणाऱ्या तसेच समाजालाही वाटते. मग असे कोण ? तर कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची बाजी लावून रात्रंदिवस काम करणारे पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी
तसेच अग्रभागी राहून त्यांना प्रोत्साहित करणारे प्रशासकीय अधिकारी नक्कीच योद्धे आहेत. याच बरोबर सामाजिक क्षेत्रातही आपापल्या परीने समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करणारे कांही समाज घटकही यामध्ये येऊ शकतात. आणि अश्या व्यक्तींचा सन्मान प्रातिनिधिक स्वरूपात व्हायलाच पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात जसे की पत्रकार, शिक्षक, समाजसेवक इत्यादींनी त्यांच्या त्यांच्या विभागाने सन्मानित करणे हे ही समजू शकतो.
दरम्यान मागच्या कांही दिवसांपासून कोरोना योद्धा पुरस्काराचे पेव फुटले आहे. खिरापत वाटल्यासारखे डिजिटल स्वरूपातले पुरस्कार देण्याची जणू काही स्पर्धा सुरू झाली आहे. पुरस्कार द्यायला हरकत नाही. परंतु यामध्ये पुरस्कार प्राप्तयोद्ध्यांची नावे पाहिली तर गंभीर झाल्याशिवाय राहवत नाही. (विशेष म्हणजे कोरोना काळात कुठलेही धाडसी काम केलेले नसतानाही यामध्ये माझे सुद्धा नाव आहे हे नम्रपणे नमूद करतो. ) कोरोना काळात धाडसी काम करणारे आणखी करतच आहेत. घरात बसून केवळ इकडची माहिती तिकडे अन कॉपी पेस्ट करणाऱ्या लोकांना जर कोरोना योद्धे म्हटले जात असेल तर खऱ्या कोरोना योद्यांच्या समर्पणाचे हे अवमूल्यनच म्हणावे लागेल. त्यामुळे जे कोणी हे पुरस्कार वाटीत आहे त्यांनी काम, समर्पण, तळमळ यासारखे वैशिष्ट्य पाहून जाहीर केले तर त्याचे महत्व अबाधित राहील.
.