किल्लेधारूर दि.३ (प्रतिनिधी )- भरधाव वेगातील मोटारसायकलची जोरात धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना तेलगाव येथे मंगळवारी रात्री आठ वाजे दरम्यान घडली. अपघातातील मयत तेलगाव येथील असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक माहिती अशी की, धारूर तालुक्यातील कोळपिंप्री येथील विशाल साळवे हा तरूण मंगळवारी रात्री भरधाव वेगात आपली मोटारसायकल क्र.एमएच ४४ एए ३६७७ धारूरकडुन तेलगावकडे येत असताना तेलगाव येथील महादेव निवृत्ती शेळके हे सरस्वती महाविद्यालय जवळुन आपल्या घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना मोटारसायकलची जोरात धडक शेळके यांना बसल्याने त्यांच्या डोक्यास जबर मार लागुन ते जागीच ठार झाले. मोटारसायकल चालक साळवे हा जखमी झाला. ऐन गावात हा अपघात झाल्याने अनेक जण घटनास्थळी धावले. मात्र शेळके जागीच ठार झाले होते. घटनेची माहिती दिंद्रुड पोलीसांना समजताच पी.एस. आय बाबासाहेब खरात, पोलीस नाईक बालाजी सुरेवाड तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन, त्यांनी १०८ रूग्ण वाहिकेतुन जखमीस उपचारार्थ दवाखान्यात पाठवले. तर मयत महादेव शेळके यांचे शव शवविच्छेदनासाठी भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. मयत महादेव शेळके तेलगाव येथीलच रहिवासी असून, ते शांत व सर्वांशी मिळुन मिसळून राहणारे व्यक्ती होते.