Advertisement

मविआतच समझोता नाही; म्‍हणूनच वेगवेगळ्या याद्या बाहेर पडत आहेत- ॲड. प्रकाश आंबेडकर

प्रजापत्र | Sunday, 31/03/2024
बातमी शेअर करा

नागपू- महाविकास आघाडीचा त्यांच्यामध्येच समझोता नाही असे आम्ही सांगत होतो, ते आता स्पष्ट झाले आहे. एकत्रित यादी जाहीर होत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर पडत आहेत. त्यांचे मतभेद कायम आहेत आणि म्हणून मैत्रीपूर्ण लढत अशी संकल्पना समोर आणल्याचे वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते नागपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

 

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, मैत्रीपूर्ण लढत होणार होती हे आम्हाला अगोदरपासून माहीत होते. म्हणून आम्ही अशी भूमिका घेतली की, महाविकास आघाडीचे भांडण आधी मिटवा. ते मिटलं की, आम्हाला मतदारसंघ मागायला सोपं होईल. परंतु, वंचित आम्हाला जागा देत नाही, कोणत्या पाहिजे ते सांगत नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. त्यांचा समझोता होत नाही, त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यामध्ये बिघाड होण्याची परिस्थिती टाळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही महत्वाच्या भूमिका घेतल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले.

 

 

ॲड. आंबेडकर यांनी सांगितले की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आम्ही पत्र लिहिले की, मविआमध्ये तुम्हाला ज्या जागा दिल्या आहेत. त्यापैकी ७ जागांवर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. दोन जागांवर आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एक कोल्हापूर आणि दुसरी नागपूर. उरलेल्या जागांची त्यांच्याकडून यादी येईल. त्यानुसार आम्ही त्यांना पाठिंबा देवू.भारतीय जनता पक्षात जी चर्चा चालू आहे आणि लोकसुद्धा विचारत आहेत की, एवढ्या सगळ्या संघटनांना सोबत घेण्याची त्यांना गरज का आहे. ज्या मतदार संघात ते लढत आहेत, त्यात त्यांचे प्राबल्य आहे. पण ज्या मतदार संघात ते लढलेले नाहीत त्यात त्यांचे प्राबल्य नाही. म्हणून ते प्राबल्य आपल्याला मिळावं म्हणून उमेदवार पळवण्याचा भाग चालला आहे. काही पक्ष फोडीचा भाग चालला आहे. मनसेसारख्या पक्षाला सुद्धा ते सोबत घेत आहेत, असेही आंबेडकर या वेळी म्हणाले.

 

 

वंचितला सोबत घेण्याच्या महाविकास आघाडीला दोन अडचणी होत्या. एक भारतीय जनता पक्ष, आरएसएस आणि मोदी यांना अंगावर घेण्याची ताकद आमच्यात आहे. दुसरी विस्थापितांच्या सत्तेला प्रस्थापितांचा कायम विरोध राहीला आहे.

तसेच, आमचा असा आरोप आहे की, आमच्या आठ जागा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे पडल्या. त्या आठ जागांमध्ये हिंदू मतं मिळाली पण मुस्लीम मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली, असल्याचेही आंबेडकर यांनी या वेळी स्पष्ट केले.

 

 

 

Advertisement

Advertisement