Advertisement

संजय गायकवाडांचा ‘प्रताप’, लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

प्रजापत्र | Thursday, 28/03/2024
बातमी शेअर करा

बुलढाणा- शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा नामांकन अर्ज दाखल केला आहे. आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे, अद्याप शिंदेंच्या शिवसेनेची लोकसभेसाठीची यादी जाहीर झालेली नाही. यादी जाहीर होण्याआधीच संजय गायकवाड यांनी अर्ज भरल्यानं शिंदेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या बुलढाण्यात प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार असतानाही भरला अर्ज आमदार संजय गायकवाडांनी अर्ज दाखल केला आहे. 

 

 

महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेत नाहीये. अशातच आता शिंदेंच्या डोक्याचा त्रास मात्र वाढला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शिंदे गटाकडून अद्याप एकाही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र, तत्पूर्वीच शिंदेंच्या आमदारानं मात्र त्यांचं टेन्शन वाढवलं आहे. बुलढाण्यात विद्यमान खासदार शिंदे गटाचे आहेत. मात्र, असं असतानाही याच मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज थेट लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संजय गायकवाडांनी उचललेल्या या पावलामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी एक नाहीतर दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बारामतीत विजय शिवतारे, अमरावतीत बच्चू कडू आणि अडसूळ यांच्यापाठोपाठ आता संजय गायकवाडांनी वेगळीच खेळी खेळली आहे. 

Advertisement

Advertisement