Advertisement

अजित पवार गटाचा पहिला उमेदवार जाहीर

प्रजापत्र | Tuesday, 26/03/2024
बातमी शेअर करा

महायुतीत काही जागांबाबत तिढा वाढत असला तरी ज्या जागांवर वाद नाही, त्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यावर घटक पक्षांनी भर दिला आहे. त्यानुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाने सीटिंग खासदार या नियमानुसार लोकसभा निवडणुकीचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनाच पक्षाने संधी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून ठाकरे गटाचे नेते माजी खासदार अनंत गिते विरोधात तटकरे अशी लढत होणार आहे.  

 

 

पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सुनील तटकरे   यांच्या नावाची घोषणा, शिरूरसाठी संध्याकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी नावाची घोषणा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार गटाचे दोन उमेदवार फायनल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील जागावाटपाचे काम 80 टक्के झाल्याचे सांगितले होते. मात्र, अजित पवारांनी हे काम ९९ टक्के पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस यांच्याशी चर्चा करून २८ मार्च रोजी महायुतीच्या सर्व जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आमची तयारी झाल्याचे अजित पवारांनी  या वेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, निवडणुका या जिंकण्यासाठी लढायच्या असतात. त्यादृष्टीने आम्ही प्रत्येक मंत्र्यांवर एक एक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे, तर आमदारावर १  विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असणार आहे. निवडणूक प्रमुख धनंजय मुंडे असणार आहेत.

Advertisement

Advertisement