Advertisement

महाविकास आघाडीसोबत जायचं का?

प्रजापत्र | Tuesday, 26/03/2024
बातमी शेअर करा

प्रकाश आंबेडकरांची उद्या सकाळी ११ वाजता अकोल्यात पत्रकार परिषद होणार आहे. प्रकाश आंबेडकर उद्या याच पत्रकार परिषदेतून लोकसभा निवडणुकीच्या  अनुषंगाने आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, त्या आधी आज संध्याकाळी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची महत्वाची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची नेमकी कोणती भूमिका असणार यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. तर, या बैठकीसाठी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे अकोल्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

 

 

प्रकाश आंबेडकर उद्या सकाळी ११ वाजता राजकीय भूमिका जाहीर करणार असून, यासाठी आज वंचित बहुजन आघाडीकडून राज्य कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आली आहे. आंबेडकर २८ मार्चला अकोल्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.  त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचा घटक म्हणून की स्वतंत्र लढणार यावर उद्याच्या पत्रकार परिषदेत शिक्कामोर्तब होणार आहे. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर आजच आपली भूमिका स्पष्ट करणार होते. मात्र, महाविकास आघाडीकडून 'आज घाईत कोणताही निर्णय घेऊ नका' अशी विनंती करण्यात आल्याने प्रकाश आंबेडकर उद्या आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. तर, आजच्या बैठकीत महाविकास आघाडीसोबत जायचं की नाही यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. 

 

 

चळवळीला लाचार करण्याचे प्रयत्न हाणून पाडले जातील : प्रकाश आंबेडकर
दरम्यान आज होणाऱ्या बैठकीपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. "चळवळीला लाचार करण्याचे प्रयत्न हाणून पाडले जातील असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. आज कार्यकर्त्यांना आवाहन करतांना त्यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी त्यांनी आपले आजोबा बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारीक वारशाचा उल्लेख केलाय. दरम्यान, आपण जी भूमिका घेऊ त्याचं फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेच्या लोकांनी समजून घ्यावे" असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

 

 

वंचितच्या बैठकीकडे लक्ष...
मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी अनेक बैठका देखील झाल्या आहेत. तर, प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना तो मान्य नसल्याने जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वंचितच्या आजच्या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.  

Advertisement

Advertisement