Advertisement

पाच दिवस पंचगंगेच्या पात्रात अडकला तरूण

प्रजापत्र | Saturday, 23/03/2024
बातमी शेअर करा

'देव तारी त्याला कोण मारी' असं म्हणतात ते काही खोट नाही. असाच एक प्रकार कोल्हापुरमधून समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरढोणमधील बेपत्ता युवक आदित्य बंडगर याला तब्बल पाच दिवसांनी पंचगंगा नदीपात्राजवळील एका जॅकवेल शेजारील खड्ड्यातून मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले. रेस्क्यू फोर्सचे जवान आणि नागरिकांनी त्याला खड्ड्यातून बाहेर काढल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

 

 

नेमकं काय घडलं?

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरच्या शिरढोणमधील तरुण आदित्य बंडगर हा अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. गेल्या पाच दिवसांपासून आदित्य बेपत्ता झाला होता. तो नदीत पडला आहे की अन्य कोठे निघून गेला आहे, याचा शोध त्याचे नातेवाईक घेत होते. अशातच नदी पात्राच्या शेजारीच त्याच्या चपला आढळल्याने स्थानिक नागरिकांनी नदीपात्रात आदित्यला शोधण्यासाठी शोध मोहीम राबवली होती.नदीपात्रात असलेल्या जॅकवेलच्या मोटारीच्या आवाजामुळे आदित्य ओरडत असूनही कोणालाही त्याचा आवाज ऐकू येत नव्हता. शुक्रवारी (२२, मार्च) रेस्क्यू फोर्सचे जवान आणि नागरिकांनी पुन्हा नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली आणि नदीपात्रात जवळील नऊ फूट खड्ड्यात आदित्यला बाहेर काढण्यात आलं.

 

 

या नदीपात्रात मगरींचा वावर आहे. गर्द झाडी झुडपे आहेत. अशात आदित्य गेली पाच दिवसांपासून अडकला होता. तो बचावासाठी ओरडत होता. मात्र जॅकवेल मोटारीच्या आवाजामुळे त्याचा आवाज कुणापर्यंत पोहोचत नव्हता. त्या खड्ड्या जवळून जाणाऱ्या त्याच्या नातेवाईकाला त्याचा आवाज कानावर पडला आणि त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. बचाव पथकाने अथक प्रयत्न करुन आदित्यला जीवदान दिलं आहे. या प्रकरणाची सध्या परिसरात एकच चर्चा होत आहे. 

Advertisement

Advertisement