अंबाजोगाई - दूध घेण्यास नकार देणाऱ्या सासूच्या डोक्यावर उकळते तेल ओतून तिचा खून करणाऱ्या सुनेला अंबाजोगाई सत्र न्या. विक्रमादित्य मांडे यांनी आजन्म कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सविस्तर माहिती अशी कि,ज्योती विष्णू शिंदे (वय २९, रा. दादाहरी वडगाव, ता. परळी) असे त्या क्रूरकर्मा सुनेचे नाव आहे. ही खळबळजनक घटना २०१७ साली दादाहरी वडगाव येथे घडली होती. ज्योतीचा विवाह मयत चंद्रकलाबाई शिंदे यांचा मुलगा विष्णू याच्यासोबत झाला होता. लग्न झाल्यापासून ज्योती विष्णूला जेवण देत नव्हती व सासू चंद्रकलाबाई यांना नेहमी टोचून बोलत होती. त्यानंतर ती डिलेव्हरीसाठी माहेरी गेली व परत आल्यानंतर चंद्रकलाबाईंना ती तिच्या मुलाला जवळ घेऊ देत नव्हती. ०३ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजता ज्योतीने तिच्या मुलाला आंघोळ घालून झोपवले व नंतर सासूकडे जावून तुम्ही माझ्या मुलाला हात लावत जाऊ नका असे म्हणाली. त्यावेळी चंद्रकलाबाई जेवण करीत होत्या. यावेळी ज्योती घरातून उकळत्या तेलाचे पातेले घेऊन आली व तुम्हाला दुध देऊ का असे सासूला विचारले. यावर चंद्रकलाबाईंनी मला नको लहान मुलाला ठेव असे म्हणताच ज्योतीने तिच्या हातातील पातेल्यात असलेले गरम उकळते तेल चंद्रकलाबाई यांच्या डोक्यावर व अंगावर टाकले. त्यामुळे त्यांचे सर्व अंग भाजले. यावेळी चंद्रकलाबाईनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्योतीने त्यांना घरामध्ये कोंडल्यामुळे त्या गंभीररित्या भाजल्या. तेवढ्यात शेजारच्या लोकांनी त्यांना सोडविले व उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दवाखान्यात अंबाजोगाई दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना चंद्रकलाबाई यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपूर्व जबाबच्या आधारे पोलीसांनी ज्योती विरोधात परळी ग्रामीण ठाण्यात कलम ३०२,१२०-ब नुसार गुन्हा नोंद करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात आरोपीस ज्योती हिला दोषी ठरवत न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड ठोठावला.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस आजीवन कारावासाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड ठोठावला.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. शिवाजी व्यंकटराव मुंडे यांनी काम पाहीले