Advertisement

"पतंजली' आयुर्वेदाची सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी

प्रजापत्र | Thursday, 21/03/2024
बातमी शेअर करा

 दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे पतंजली आयुर्वेदाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात रामदेव बाबा यांना फटकारले असून त्यांना स्वत:कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिले आहेत. त्यानंतर आता पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल माफी मागितली आहे.

 अधिक माहितीनुसार, पतंजली आयुर्वेदाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी बिनशर्त माफी मागितली आहे. पतंजली आयुर्वेद आणि त्याचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या औषधांच्या जाहिराती दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात माफीनामा सादर केला आहे.तसेच या माफीनाम्यात पुन्हा अशा जाहिरात प्रसारित न करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. कंपनीच्या मीडिया विभागाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती नव्हती. पतंजली उत्पादनांचा वापर करून नागरिकांना निरोगी जीवन जगण्यास प्रोत्साहित करणे हा यामागचा उद्देश आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

 

दरम्यान, बाबा रामदेव यांच्यावर लसीकरण मोहीम आणि आधुनिक औषधांविरोधात मोहीम चालवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने पतंजलीला चांगलेच फटकारले होते. तसेच बाबा रामदेव  आणि आचार्य बाळकृष्ण या दोघांनाही २ एप्रिल २०२४ रोजी अवमान नोटीसला उत्तर न दिल्याने न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

Advertisement

Advertisement