Advertisement

संपादकीय अग्रलेख - महायुतीची वाट अवघडच

प्रजापत्र | Thursday, 21/03/2024
बातमी शेअर करा

देशात चारशेपारचे स्वप्न पाहणार्‍या भाजपला महाराष्ट्रात मागच्या वेळी इतक्या जागा तरी मिळवाव्याच लागतील. भाजप आणि शिवसेना युतीने त्यावेळी ४३ जागा जिंकल्या होत्या. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. महाराष्ट्रात महायुतीच्या नावाखाली भलेही भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष फोडून आणि आता जोडीला मनसेचे इंजिन लावण्याचा देखील प्रयत्न केला असेल मात्र जमिनीवरील वास्तव वेगळे आहे. सामान्य माणूस अस्वस्थ असून महायुतीची वाट महाराष्ट्रात तरी अवघड आहे.

 

 

भाजपने यावेळी रालोआसाठी ‘चारशे पार’चे स्वप्न पाहिलेले आहे. यात भाजपच्या एकट्याच्या ३७० पेक्षा अधिक जागा निवडून याव्यात अशी भाजपची रणनिती आहे आणि ते करायचे असेल तर साहजिकच भाजपला महाराष्ट्रासारख्या राज्यावर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपला आपले संख्याबळ वाढविण्याची फारशी संधी अजूनही निर्माण झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र आणि फारतर कर्नाटकात या पक्षाला अपेक्षा ठेवता येईल असा पक्षांच्या नेत्यांचा होरा आहे. आणि त्यासाठीच महाराष्ट्राला राजकीय दृष्ट्या रसातळाला नेवून का होईना पण या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त खासदार आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. 

 

परंतू भाजपला वाटते तितका महाराष्ट्र सोपा राहिलेला नाही. मध्यंतरीच्या काळात विविध जातीसमुहांच्या आरक्षण आंदोलनाच्या माध्यातून भाजपने महाराष्ट्रात जातीय पातळीवर धु्रवीकरण करण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या गावागावात मराठा आणि ओबीसी अशी दरी कशी वाढेल हेच सरकार पातळीवर पाहिले गेले. महाराष्ट्रात आंदोलनाच्या माध्यमातून हिंसाचार सुरू असताना सरकार आणि सारीच व्यवस्था शांत होती. आता मात्र ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. एकुण काय तर आता सरकार ओबीसींचे तारणहार कसे आहे हे दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. मराठा समाजाची मते आपल्याला मिळणार नसतील तर ओबीसींना अधिक जवळ कसे आणता येईल हे भाजप पाहत आहे. मात्र केवळ अशी जातीय समिकरणे निर्माण करून निवडणुकीतील यशाचा विचार भाजप करत असेल तर भाजपच्या दिल्लीस्थित नेत्यांना महाराष्ट्र कळला आहे का? असे सांगण्याची वेळ आली आहे.

 

आज ग्रामीण भागातील वास्तव अत्यंत वेगळे आहे. गावागावातला शेतकरी अस्वस्थ आहे. जातीच्या पलिकडे जावून शेतकर्‍याची बिघडचाललेली अर्थव्यवस्था आणि त्याला कारणीभूत असलेली सरकारची धोरणे यावर शेतकरी बोलत आहे. जे शेतकर्‍यांचे तेच बेरोजगार तरूणांचे आहे. मधल्या काळात राज्यातील वेगवेगळ्या विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षांमध्ये जे काही झाले त्यामुळे तरूणाई अस्वस्थ आहे. धनगर समाज असेल किंवा आणखी इतर कोणतेही समाज त्यांच्या आरक्षणाचे विषय तडीस नेण्यास सरकारला यश आलेले नाही. त्यामुळे त्या सर्वांची अस्वस्था अजूनही कायम आहेच.
याची जाणीव भाजपला नाही असे नाही आणि म्हणूनच भाजप महायुतीच्या नावाखाली जमतील तितकी माणसे जमतील तेथुन जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरूवातीला शिवसेना फोडली, त्यानंतर राष्ट्रवादी फोडली मात्र त्यातूनही अपेक्षीत पल्ला गाठता येत नाही हे येव्हाना भाजपच्या लक्षात आलेले आहे. म्हणूनच मधल्या काळात ‘आदर्श’ फेम अशोक चव्हाणांना भाजपने पावन करून घेतले. आता उत्तर भारतीय मतांचा फटका बसण्याचा धोका असतानाही मनसेचे इंजिन महायुतीला जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र असे असले तरी महायुतीला अजूनही निर्वीवाद वाट आहे असे चित्र राज्यात दिसायला तयार नाही. शरद पवारांसारख्या नेत्यांनी आता कुठे एकएक पत्ते उघडायला सुरूवात केली आहे. आणि महायुतीला त्याचे धक्केही बसू लागले आहेत. फडणवीसांच्या एकंतरच स्पर्धेतले नेते संपविण्याच्या धोरणाचा फटका देखील येत्या निवडणुकीत भाजपला बसेल असे देखील संकेत आहेत. महाराष्ट्रात मोदींना प्रचाराला पुरेसा वेळ मिळावा असेच सारे नियोजन झालेले आहे. इतिहासात कधीच नाही असे पाच टप्प्यात मतदान महाराष्ट्रात होणार आहे. याचे फायदे कोणाला उचलायचे आहेत हे तर स्पष्ट आहे. परंतू इतके करूनही महाराष्ट्रातील समाजमन मात्र वेगळ्याच वाटेने जाताना दिसत आहे.

Advertisement

Advertisement