राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाच्या वादाच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा दिलासा दिला आहे. शरद पवार गटाला तुतारी चिन्ह लोकसभा निवडणुकीपर्यंत वापरता येणार आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नावही वापरण्याची मुभा दिली आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाला तुतारी चिन्ह आता राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीतही वापरता येणार आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह राखीव ठेवावे आणि इतर कोणत्याही पक्षाला , उमेदवाराला देऊ नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही महिन्यांपासून फूट पडली आहे. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा दोन गटात पक्ष विभागला गेला आहे. या दोन्ही गटांची कायदेशीर लढाईदेखील निवडणूक आयोगात पार पडली. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या आधारावर अजित पवार यांच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. तसेच अजित पवार यांचा गट हाच मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, अशी मान्यता निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात गेलाय. या प्रकरणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.