Advertisement

जागा वाटपावरुन महाविकास आघाडीत बिघाडी!

प्रजापत्र | Tuesday, 19/03/2024
बातमी शेअर करा

लोकसभा निवडणुकींचे बिगुल वाजताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचे चित्र दिसत आहे. अशातच उद्धव ठाकरेंकडून मात्र उमेदवारांची घोषणा केली जात आहे. यावरुन आता काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली असून उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठकांवर बैठक सुरु आहेत. मात्र अद्याप जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याची माहिती मिळत आहे. ४-५ जागांवर पेच कायम आहे. एकीकडे ही स्थिती असताना उद्धव ठाकरे मात्र आपल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. त्यामुळेच काँग्रेस नेत्यांनी नाराजी दर्शवली आहे.लोकसभा निवडणुकींच्या दृष्टीने उद्धव ठाकरे सध्या सध्या राज्यभर दौरे करत असून परस्पर उमेदवारी जाहीर करत आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा कायम असताना उद्धव ठाकरे करत असलेल्या घोषणेमुळे काँग्रेस नेते नाराज आहेत. याबाबत आज दिल्लीत काँग्रेस नेत्यांची वरिष्ठांसोबत बैठक होणार असून या बैठकीत ठाकरेंच्या सेनेविरोधात तक्रार केली जाणार आहे. 

 

 

जागेवरुन काँग्रेस- ठाकरे गटात वाद!

दरम्यान, सांगली लोकसभेच्या जागेवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहेत. सांगली लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची घोषणा करण्यात आली आहे, मात्र याठिकाणी काँग्रेसचे विशाल पाटील इच्छुक आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नसल्याचा इशारा विश्वजित कदम यांनी दिला आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement