Advertisement

शरद पवार गटाची राज ठाकरेंना ऑफर?

प्रजापत्र | Tuesday, 19/03/2024
बातमी शेअर करा

  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत प्रकाश आंबेडकर यांना अल्टिमेटम दिल्याचा दावा केला जात असून, दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चार दिवसांतील दुसऱ्या दिल्लीवारीमुळे त्यांच्या महायुतीमधील सहभागाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यावरून तर्क-वितर्क लढवले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्याने राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत येण्याबाबत आवाहन केल्याचे सांगितले जात आहे.

 

 

मनसे सहभागी झाल्यास महायुतीला बळ मिळेल. दक्षिण मुंबईसह मनसेला आणखी कोणते मतदारसंघ दिले जातात, याची उत्सुकता असून, मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नाशिक, पुणे या मतदारसंघांत मनसेची महायुतीला मदत होऊ शकते. शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रधर्म पालनाची आठवण करून दिली आहे. 

 

महाराष्ट्रातील जनता भाजपासोबत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे भाजपा लहान पक्षांना सोबत घेऊन मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन पक्ष फोडूनही या दोन्ही पक्षांचा काही उपयोग नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले आहे. यामुळे ज्या पक्षांना पाच वर्षांपूर्वी महत्व दिले जात नव्हते, त्यांची आठवण आता भाजपला झाली आहे, असे रोहित पवार म्हणाले. राज ठाकरे यांच्या भाषणांचा फॅन आहे. त्यांनी महाविकास आघाडीसोबत यावे ही आपली इच्छा आहे. भाजपसोबत जाण्याआधी त्यांनी विचार करावा. २०१९ मध्ये भाजपने छोट्या पक्षांना योग्य वागणूक दिली नव्हती, हे लक्षात घ्यावे. आता भाजपासोबत असलेल्या दोन पक्षांचा त्यांना फायदा दिसत नाही, म्हणून छोट्या पक्षांना भाव देत आहेत. महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

 

 

दरम्यान, २०१९ प्रमाणे एकत्र येऊन भाजपाविरोधात लढलो तर राज ठाकरेंबद्दलची आपुलकी वाढेल. ते धाडसी आणि लढणारे नेते आहेत. ईडी आणि विविध संस्थांना घाबरून एखादा नेता त्यांची भूमिका बदलत असेल तर योग्य नाही. लोकांना लढणारे नेते पाहिजेत. महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या वतीने महाशक्तीच्या विरोधात जो लढेल तो लोकांच्या मनात बसणार आहे. लढायची परिस्थिती असताना भाजपाबरोबर न जाता आपण एकत्र येऊन लढले पाहिजे. तसेच महाराष्ट्राच्या बाजूने लढणे महत्त्वाचे आहे. ऑफर देणारा मी कोण आहे. आमचे नेते यासंदर्भात निर्णय घेतील. माझे एकच मत आहे की त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा करणे गरजेचे आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.
 

Advertisement

Advertisement