Advertisement

ज्योती मेटे साधणार उद्या कार्यकर्त्यांशी संवाद

प्रजापत्र | Sunday, 17/03/2024
बातमी शेअर करा

बीड दि.१७ (प्रतिनिधी): लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीला देशभरात सुरूवात झाली असून बीड जिल्ह्यात महायूतीने पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही समोर आलेला नसून दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना शरद पवारांकडून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर असतांना आता उद्या (दि.१८) सकाळी ११ वा. शिवसंग्राम कार्यालयात कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करण्यासाठी शिवसंग्रामने महत्त्वपुर्ण बैठक सकाळी  आयोजित केली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद यांनी केले.
बीड जिल्ह्यात यंदा लोकसभा निवडणूक रंजक होणार आहे. प्रितम मुंडे यांचा यावेळी भाजपाने पत्ता कट केला असून त्यांच्या जागी पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली.तर शरद पवारांनी आपले पत्ते अद्यापही उघडे केलेले नसून बीड लोकसभेसाठी अनेकांची नावे चर्चेत होती. त्यात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचेही नाव अलीकडच्या काळात आघाडीवर आले आहे. आता ज्योती मेटेंनीही संभाव्य उमेदवारी लक्षात घेवून शिवसंग्राम पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी उद्या सकाळी ११ वा. महत्त्वपुर्ण बैठक आयोजित केल्याची माहिती आहे. शरद पवारांकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी बजरंग सोनवणे यांचे नावही आघाडीवर होते. मात्र पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोनवणे यांची समजूत काढली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता ज्योती मेटे या शरद पवारांसोबत जाणार असल्याचे संकेत असून आज त्या 11 वाजता आपल्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संवाद साधणार आहेत. दुपारपर्यंत ज्योती मेटेंनी आपली राजकीय भुमिका स्पष्ट केलेली असेल असा अंदाजही लावला जात आहे. भाजपला सोडचिट्टी देऊन शिवसंग्राम महाविकासआघाडीसोबत जाणार का हे ही पाहणे महत्वाचे ठरेल.

Advertisement

Advertisement