केंद्रिय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांना देण्याचा निर्णय जाहीर केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा करत फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावर आक्षेप नोंदवला. यावर सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरु नका, असे आदेश दिले आहेत.
आजच्या सुनावणीत काय घडलं?
आजच्या सुनावणीत शरद पवार गटाकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला. यामध्ये त्यांनी अजित पवार शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ कसं वापरतात? -ही फसवणूक आहे,आमच्या लोकप्रियतेचा वापर का केला जातो आहे? असा सवाल उपस्थित केला. तसेच ग्रामीण भागात लोक म्हणत आहेत की घड्याळाला मत द्या. अजित पवार गटाचे पोस्टर्स पाहा, त्यावर शरद पवारांचा फोटो आहे. असे म्हणत अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाचे पोस्टर्सही न्यायालयात दाखवले.
ग्रामीण भागात घड्याळ हे चिन्ह प्रसिद्ध आहे , पण छगन भुजबळ म्हणतात, ग्रामीण भागात हे पोस्टर्स कायम ठेवा कारण आजही शरद पवार यांची लोकप्रियता कायम आहे, असे म्हणत त्यांना आमचा फोटो, घड्याळ वापरण्याची परवानगी देऊ नका ही आमची मागणी आहे? असाही युक्तीवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.