मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये असलेल्या मंत्रालयाच्या इमारतीला (वल्लभ भवन) आज (शनिवारी) सकाळी मोठी आग लागली. आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ही आग इतकी भीषण आहे की त्याचा धूर आकाशात सर्वत्र दिसत आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जीवित वा वित्तहानी झाली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आगीची माहिती मिळताच भोपाळ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना पाहताच अग्निसुरक्षा तज्ज्ञ पंकज खरे घटनास्थळी हजर आहेत. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. खासदारांचे सचिवालय वल्लभ भवनमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय येथे पाचव्या मजल्यावर आहे. आग एवढी भीषण होती की, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पाच आणि सहा क्रमांकाच्या गेटसमोर सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इमारतीत धूर निघताना दिसला. त्यानंतर मंत्रालयाचे सुरक्षा अधिकारी आणि अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
अग्निशमन दलाच्या चार गाड्यांद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी सुट्टी असल्याने एकही कर्मचारी मंत्रालयात उपस्थित नव्हता.
यापूर्वी वल्लभ भवनाजवळील सातपुडा भवनच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. त्यात आरोग्य विभागाच्या अनेक महत्त्वाच्या फायली व कागदपत्रे जळाली.