बीड - मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्याकडून राज्यभराचा दौरा केला असून, दुसरीकडे याच मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांना मराठा आंदोलक जाब विचारतांना दिसत आहे.
बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा कार्यक्रम बंद पाडल्याची घटना समोर आली आहे. आरक्षण मिळेपर्यंत गावात एकही राजकीय कार्यक्रम होऊ न देण्याची आंदोलकांची भूमिका आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा कार्यक्रम मराठा आंदोलकांनी बंद पाडला असून, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावामध्ये कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. माजी आमदार भीमराव धोंडे हे गाव चलो अभियान या कार्यक्रमासाठी निमगाव चोभा या गावात आले होते. यावेळी हा कार्यक्रम सुरू असताना मराठा आंदोलक तिथे पोहचले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मराठ आंदोलकांनी कार्यक्रम बंद करायला लावला. मराठा आंदोलकांची आक्रमक भूमिका पाहता कार्यक्रम त्वरित बंद करण्यात आला.