अंबाजोगाई- मुंबईवरून आपले दिवसभराचे कामकाज आटोपून छत्रपती संभाजी नगर मार्गे बीड वरून महाशिवरात्रीसाठी परळीकडे निघालेले राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे अचानक मध्यरात्री अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात येऊन पोहोचले.
परळी मतदारसंघातील निरपणा या गावातील काही जणांना अन्नातून विषबाधा झाली असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले असल्याबाबतचे वृत्त समजतात धनंजय मुंडे यांनी आपला परळीच्या दिशेने निघालेला ताफा थेट अंबाजोगाई कडे वळवत, स्वारातीमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या चौकशीसाठी मध्यरात्री येऊन भेट देत विचारपूस केली.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे जाऊन निरपणा गावातील अन्नातून विष बाधा झालेल्या सर्वच रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत त्यांना धीर दिला, तसेच त्यांच्यावर तातडीने योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना दिल्या; तसेच सदर रुग्णांना भगरीतून विषबाधा झाली असल्याने याबाबत योग्य चौकशी करण्याचेही निर्देश धनंजय मुंडे यांनी अन्न भेसळ व सुरक्षा अधिकारी श्री देवरे यांना दूरध्वनीवरून दिले. यावेळी स्वारातीचे डीन डॉ.धपाटे, डॉ. मोगरेकर, डॉ.चव्हाण, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी, तानाजी देशमुख, विश्वंभर फड, रणजित चाचा लोमटे, अजित गरड यांसह आदी उपस्थित होते.