ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना थेट इशारा दिला होता. ''आमच्या कार्यकर्त्यांना एकदा दमदाटी केली, आता बस्स. पुन्हा जर असं केलं तर शरद पवार म्हणतात मला...'' असं म्हणत इशारा दिला होता. त्यावर सुनील शेळके यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे.
शरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, पवार साहेब मोठे नेते आहेत. इतकी वर्षे ते राजकारणात आहेत. ५५ वर्षे ते राजकारण करत आहेत. या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला धमकी देणं योग्य नाही.
फडणवीस पुढे म्हणाले की, शरद पवारांनी त्यांच्या विधानाचा पुनर्विचार करावा. ते कुठल्या स्तराला आहेत, याचा विचार करावा. कुणी आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल असं मला वाटत नाही.
लोणावळ्यातील शरद पवारांच्या सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये असं सुनील शेळकेंनी आपल्याला धमकावलं आहे, अशी तक्रार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडं केली होती. त्यानंतर शरद पवारांनी आमदार शेळकेंना इशारा दिला होता.
आमदार सुनील शेळकेंचं पवारांना उत्तर
शरद पवार यांच्या विधानानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार सुनील शेळके म्हणाले की, शरद पवार आमचे श्रद्धेय आहेत, उद्या देखील राहतील. पण साहेबांनी या बाबतीत वक्तव्य करताना शहानिशा करणं अपेक्षित होतं. मागील ५० ते ५५ वर्षांचा राजकीय इतिहास पाहिला तर साहेबांनी कुठल्याही पदाधिकाऱ्यावर टीका केली नाही. विरोधकांवर देखील व्यक्तिगत टीका केली नाही. पण साहेबांनी माझ्याबद्दल असं वक्तव्य केलं याचं मला आश्चर्य वाटतंय, असंही आमदार सुनिल शेळके यावेळी म्हणाले.
सुनील शेळके घेणार शरद पवारांची भेट
आपण शरद पवार यांना भेटणार असल्याचं आमदार शेळके यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, मी साहेबांना भेटणार असून त्यांनी मी कोणच्या वाटेला गेलो, माझी काय चूक झाली ते सांगावं. मी कार्यकर्त्यांना दम दिला ही माहिती ज्यांनी दिली ती खरी की खोटी दिली हे आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं. साहेबांनी केलेल्या वक्तव्याची मी दखल घेणार. पुढील आठ दिवसात मी दम दिला असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा आणि पुराव्यानिशी माहिती द्यावी, अन्यथा मी राज्यभर सांगणार की मावळ तालुक्यात येऊन साहेबांनी (शरद पवार) माझ्यावर खोटे आरोप केले, असेही सुनिल शेळके यावेळी म्हणाले.