Advertisement

पैलवान शिवराज राक्षेला शासकीय नोकरी

प्रजापत्र | Tuesday, 05/03/2024
बातमी शेअर करा

डबल महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान शिवराज राक्षेला शासकीय नोकरी देण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवराज राक्षेला क्रिडा अधिकारी म्हणून नियुक्तीपत्र दिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री शंभुराज देसाईही उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल शिवराज राक्षेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले.

मुळचा नांदेडचा असणारा मल्ल शिवराज राक्षे याने डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. जानेवारी २०२३ मध्ये पुण्यामध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली होती. या चुरशीच्या लढतीत शिवराज राक्षेने बाजी मारत महाराष्ट्र केसरीवर पहिल्यांदा नाव कोरले होते.

त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये  ६६ व्या महाराष्ट्र केसरीतही त्याने अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र अंतिम लढतीत त्याला सिकंदर शेखकडून पराभव स्विकारावा लागला. परंतु धाराशिवमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुन्हा बाजी मारत शिवराजने महाराष्ट्र केसरीची गदा पुन्हा उंचावली. हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षेविरुद्ध ही लढत झाली. ज्यामध्ये शिवराजने बाजी मारली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर शिवराज राक्षेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. आतापर्यंतचा माझा प्रवास हा खडतर होता. त्यात मुख्यमंत्र्यांनी शासकिय अधिकारी म्हणून दिलेलं नियुक्ती पत्रकामुळे माझी आणि माझा कुटुंबियांची मेहनत आज सार्थ ठरल्याची भावना त्याने व्यक्त केली. 
 

Advertisement

Advertisement