परळी वैजनाथ- मराठवाड्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या परळी (जि. बीड) येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या संच क्रमांक चारची धूरवाहक चिमणी गुरूवारी (दि.२९) जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर आज (दि. १) तिसरी चिमणीही जमीनदोस्त करण्यात आली. परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनलेल्या तीन धुराच्या चिमण्यांपैकी अखेरची चिमणी आज जमीनदोस्त करण्यात आल्याने परळी वैजनाथ थर्मलचा अखेरचा अवशेषही जमीनदोस्त झाला.
परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनलेल्या तीन धुराच्या चिमण्यांपैकी एक चिमणी सप्टेंबर २०२२ मध्ये जमीनदोस्त करण्यात आली होती. गुरूवारी सकाळी संच क्रमांक चारची १२० मीटर उंचीची चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यानंतर आज दुपारी १ वाजता संच क्रमांक पाचची २१० मी. उंचीची तिसरी चिमणीही जमीनदोस्त करण्यात आली.
मराठवाड्यातील पहिले औष्णिक विद्युत केंद्र परळी येथे १९७१ मध्ये सुरू झाले. धूर वाहण्यासाठी तीन चिमण्या निर्माण करण्यात आल्या होत्या. सद्यस्थितीला परळी येथे एकूण आठ संच निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यापैकी संच क्रमांक एक, दोन, तीन हे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संच क्रमांक तीन, चार व पाच हे संच आयुर्मान संपल्यामुळे आवसायनात काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संचांच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. यामध्ये संच क्रमांक तीन पूर्णतः अवसायनात काढण्याची प्रक्रिया सप्टेंबर २०२२ मध्येच पूर्ण करण्यात आली .
संच क्रमांक चारमधील सर्व मशिनरी यंत्रणा व या संचाच्या संबंधित सर्व विभाग हे एक एक करून नाहीसे करण्यात आले. २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक पाच ३१ डिसेंबर १९८७ मध्ये सुरू करण्यात आला होता. हा संच आता संपूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. २०१० मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक ५ चे आयुर्मान संपल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने हा संच स्क्रॅपमध्ये काढला आहे. आयुर्मान संपल्याने २०१५ पासून हा संच बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर सन २०१९ पूर्वी हा संच स्क्रॅप मध्ये काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी महाजनकोने परळी औष्णिक केंद्रातील ३० मेगावॉटचे दोन संच स्क्रॅपमध्ये काढलेले आहेत. विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन, चार , पाच हे तीन संच २०१९ पासून बंद आहेत. त्यापैकी संच क्रमांक पाचची २१० मी. उंचीची चिमणी आज दुपारी पाडण्यात आली आहे. यावेळी विद्युत केंद्राचे अधिकारी, सुरक्षा विभागाचे कर्मचारी, कन्स्ट्रक्शन विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.