Advertisement

गरीब रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात मिळणार उपचार

प्रजापत्र | Thursday, 29/02/2024
बातमी शेअर करा

मुंबई : राज्यातील खासगी आणि धर्मदाय रुग्णालयात गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मंत्रालयातील मुख्य इमारतमधील पाचव्या मजल्यावर विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षेच्या माध्यमातून गरीब रुग्णांना राज्यातील खासगी तसेच धर्मदाय रुग्णालयात १० टक्के आरक्षित खाटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्य सरकारने या राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख म्हणून आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 

गरीब व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी उच्च न्यायालयाने योजना तयार केली आहे. त्यानुसार, प्रत्येक खासगी, तसेच धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व १० टक्के खाटा दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे. तथापि, गरीब व दुर्बल घटकातील रूग्णांना या खाटा उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. ही रुग्णालये धर्मादाय स्वरूपाची असल्याने त्यांना सरकारच्या अनेक सवलतींचा फायदा मिळतो. मात्र ही रूग्णालये गरीबांसाठी आरक्षित खाटा पारदर्शकपणे उपलब्ध करून देत नसल्याने त्याचा फायदा सरकारला अपेक्षित असलेल्या गरीब रुग्णांना होत नाही. त्यामुळे या खासगी रुग्णालयातील १० टक्के आरक्षित खाटांसंदर्भात रुग्णांना अचूक माहिती मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एक स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.

 

उद्घाटनापूर्वीच कक्ष सुरू
धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा गरीब व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने तातडीने उपलब्ध करून देणे व त्यावर देखरेख ठेवण्याचे काम या कक्षामार्फत करण्यात येणार आहे. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर असलेल्या या राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाचे लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कक्षाचे काम रुग्णांशी संबंधित असल्याने उद्घाटन होण्यापूर्वीच ते सुरू करण्यात आले आहे. रोज अनेक गरीब व दुर्बल घटकातील रूग्णांना धर्मादाय रुग्णालयात खाटा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.

 

मदतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
रुग्णांचे आधार कार्ड, शिधापत्रिका, तहसीलदारकडून उत्पन्न दाखला, डॉक्टरांकडून खर्चाचा तपशील, तसेच औषधाची चिठ्ठी आवश्यक आहे.

 

Advertisement

Advertisement