Advertisement

 शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चेनंतर बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे

प्रजापत्र | Sunday, 25/02/2024
बातमी शेअर करा

कोल्हापूर- महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतल्याचे महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर संजय शिंदे यांनी रविवारी जाहीर केले.

 

 

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे शासकीय कर्मचाऱ्यांना जे आदेश निघतील तेच शिक्षकांना लागू होतील असे मान्य करण्यात आल्यामुळे १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात देऊन नंतर सेवेत आलेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दि. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासन अनुकूल असून त्याबाबत लवकरच निर्णय जाहीर होणार आहे आणि शिक्षकांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ देण्यात येतील हे स्पष्ट केले आहे. मान्य केलेल्या मागण्या लक्षात घेऊन राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बहिष्कार मागे घेत असल्याचे जाहीर केले. या चर्चेत मुख्य शिक्षण सचिव रणजीतसिंह देवल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, सहसचिव तुषार महाजन , खाजगी सचिव मंगेश शिंदे, महासंघातर्फे अध्यक्षांसमवेत समन्वयक प्रा मुकुंद आंधळकर, सरचिटणीस प्रा संतोष फासगे, उपाध्यक्ष प्रा. सुनील पूर्णपात्रे सहभागी झाले.

 

 

या मागण्या मान्य...

-वाढीव पदावरील प्रलंबित २५३ शिक्षकांच्या समायोजनाचा आदेश लवकरच
-२००१ पासून आय टी विषयाच्या मान्यताप्राप्त शिक्षकांना वेतनश्रेणी मिळण्याबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी, लवकरच रिक्त पदावर समायोजन
-शिक्षकांचे समायोजन ६० दिवसात
-शिक्षकांना १०, २०, ३० वर्षांची सुधारित सेवांतर्गत वेतनश्रेणी देण्याचा प्रस्ताव सादर असून तोपर्यंत शिक्षकांना २० टक्क्यांची अट शिथिल
-२०, ४०, ६० टक्के अनुदान घेत असलेल्यांना पुढील टप्पा लवकरच लागू
-शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत २१,६७८ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू
-उर्वरित मागण्यांबाबत आगामी १५ दिवसात बैठक

 

 

 

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणार...

बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत भाषा विषयांच्या परीक्षा झाल्या आहेत. अद्याप ५० लाखांहून अधिक उत्तरपत्रिका तपासायचे काम सुरु झाले नव्हते, ते आता सुरु होणार असल्याने विद्यार्थी व पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. बारावीचा निकाल वेळेवर लावण्यात येईल असे महासंघाचे सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे यांनी जाहीर केले आहे.

Advertisement

Advertisement