रायगड - निवडणूक आयोगाने त्यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिल्यानंतर शरद पवार गट मैदानात उतरला आहे. या नव्या चिन्हाच्या अनावरणासाठी शरद पवार गटाकडून रायगडावर आज खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रायगडावर नव्या चिन्हाचे अनावरण करत शरद पवार यांनी आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले. या सोहळ्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते.
काय म्हणाले शरद पवार?
"हा एक वैचारिक दर्जाचा संघर्ष आहे. आणि ज्यावेळी असा संघर्ष लागतो त्यावेळेला एक प्रकारचा आदर्श सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढायला मदत करणारा हा वारसा आहे. शिवछत्रपतींचा कालखंड तसा होता. तो कालखंड आत्मविश्वासाचा होता. राज्य नव्हतं पण सामान्य माणसाचं स्वप्न होतं. ज्यामधूनच हे राज्य उभं राहिलं."
"या देशामध्ये अनेक राजे होऊन झाले. संस्थानिक झाले. पण यामध्ये शिवाजी महाराजांची ओळख वेगळी होती. शिवरायांचे राज्य हे सामान्यांचे राज्य झाले. ते जनतेचे राज्य झाले. हिंदवी स्वराज्य उभं करण्याचं कामन छत्रपतींनी केले. पुन्हा जनतेचं राज्य येण्यासाठी कष्ट करायला लागेल. ही तुतारी प्रेरणा देणारी आहे. या ऐतिहासिक भूमीतून प्रेरणा घेऊन राज्य उभं करु, जनतेचे राज्य बनवू.." असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे सर्व नेते, आमदार तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकींचे रणशिंग फुंकले. दरम्यान, या कार्यक्रमानंतर पुण्यामध्ये आज इंडिया आघाडीची सभाही पार पडणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आदित्य ठाकरे या सभेला उपस्थित राहणार आहेत.