अंबाजोगाई- निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतन वाढ झाली पाहिजे. त्यांना राहण्यासाठी नवीन वसतिगृह मिळालेच पाहिजे. अशा विविध मागण्यांसाठी शुक्रवार पासून निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याचा फटका स्वा.रा.ती. रुग्णालयातील रुग्णसेवेचा बसला आहे. परिणामी रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे.
शुक्रवारी सकाळी स्वाराती रुग्णालयाच्या ओपीडी समोर घोषणाबाजी व निदर्शने करत निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती मार्ड संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनात स्वाराती मधील निवासी डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. बाह्य रुग्ण विभगातील सेवा बंद केल्या आहेत. या कामबंद आंदोलनात मानवतेच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून तातडीच्या अत्यावश्यक सेवा जसे की अपघात विभाग, आय सी यू व तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू ठेवल्या आहेत.
स्वाराती मधील निवासी डॉक्टरांनी सकाळ पासून बाह्य रुग्ण विभागासमोर एकत्र येत घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली. निवासी डॉक्टरांना "विद्यावेतन वाढ, मिळालीच पाहिजे", "नवीन वसतिगृह मिळालेच पाहिजे", "मार्ड एकजुटीचा, विजय असो" अशा घोषणा दिल्या. जोर्यंत विद्यावेतन वाढीचा मंत्रिमंडळ निर्णय होत नाही. आणि नवीन वसतिगृह मंजुरीचे आदेश मिळत नाहीत. तोपर्यंत आंदोलन कायम करण्याचा इशारा मार्ड अध्यक्ष तथा राज्य सचिव डॉ राहुल मुंडे यांनी दिला. स्वाराती मधील वसतिगृह अपुरे असल्यामुळे निवासी डॉक्टरांच्या वस्तीगृहाच्या मागणी कडे शासनाने सहानुभूतीने पाहून तात्काळ वसतिगृह मंजूर करण्याचे आवाहन उपाध्यक्ष डॉ प्रवीण शेरखाने यांनी केले. या आंदोलनात सर्व निवासी डॉक्टरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निदर्शने केली. यामध्ये डॉ राहुल मुंडे, डॉ प्रवीण शेरखाने, डॉ तेजस मडकवाडे, डॉ रुपाली वाघमारे, डॉ सचिन ढाकरे, डॉ लिथिया, डॉ तनुश्री, डॉ शंतनु, डॉ कामरान, डॉ आदित्य वाघमारे, डॉ सूरज चव्हाण यांच्या सह निवासी डॉक्टरांनी सहभाग घेतला.